फडणवीस मुख्यमंत्री असले तरी त्यांची भाषा अजूनही विरोधी पक्षनेत्यांसारखीच

0
11

नागपूर – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले असले तरी त्यांची भाषा अजूनही विरोधी पक्षनेत्यांसारखीच आहे. विशेषत: वेगळय़ा विदर्भाबाबत ते वारंवार बोलू लागले आहेत. अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसून राज्याचे तुकडे करण्याची भाषा ते कशी करू शकतात? असा प्रहार ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी येथे केला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विदर्भ आणि मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागांसाठी जाहीर केलेले पॅकेज ही केवळ फसवणूक असल्याची टीकाही त्यांनी केली.
अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जर विदर्भाचा विकास करू शकणार नसाल तर केवळ विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून कसे करणार? नेत्यांना वेगळा विदर्भ इथल्या विकासासाठी नको आहे, तर त्यांना पदांसाठी वेगळा विदर्भ हवा आहे. विदर्भ-मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. मुख्यमंत्री म्हणून या भागाला चांगला दिलासा देण्याची गरज होती.
परंतु सात हजार कोटींचे पॅकेज म्हणून जी रक्कम जाहीर केलेली आहे ती विदर्भवासींची शुद्ध फसवणूक आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या सवलती मिळतात, उदाहरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची फी माफी, कर्जावरील व्याज माफी, कर्जाचे पुनर्गठन अशा सवलती मिळतच असतात. त्याच तुम्ही पॅकेजमध्ये दाखविल्या. पाच वर्षात काय काय योजना करणार त्या पॅकेजमध्ये दाखविल्या. आज शेतकऱ्यांच्या हातात पडेल, असे काहीही त्यांना दिलेले नाही, या वस्तुस्थितीकडेही राणे यांनी लक्ष वेधले.
सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही अपयशी
नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन अत्यंत निराशाजनक झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरले आहेत. सत्ताधारी बाकांवर आले तरी भाजपाचे मुख्यमंत्री आणि मंत्री विरोधी पक्षांत असल्यासारखे वागत आहेत. तर विरोधी पक्षानेही कोणताही मुद्दा आक्रमकपणे मांडल्याचे दिसत नाही. आक्रमकपणे सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी असताना विरोधी पक्षांतील नेते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत. म्हणूनच हे सरकार आणि विरोधी पक्ष दोघेही सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत, असे रोखठोक प्रतिपादनही त्यांनी केले.