आदिवासींना दिला जीवन जगण्याचा ‘प्रकाश’

0
11

गडचिरोली-शिक्षणाच्या अभावामुळे कायम दारिद्रय़ात खितपत पडलेल्या आदिवासींना वैद्यकीय सेवा आणि वन्यप्राण्यांवर माया करणार्‍या भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्पाला २३ डिसेंबर रोजी ४0 वर्षे पूर्ण झाले आहेत. रमण मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करून या भागात राहणार्‍या आदिवासींना आरोग्याची अविरत सेवा देत जीवन जगण्याचा ‘प्रकाश’ दिला आहे.
२३ डिसेंबर १९७३ रोजी आमटे दाम्पत्य हेमलकसा येथे आले. सभोवताल असलेले घनदाट जंगल व सरपटणारी विषारी सापांची वंशावळ, सोबतच वन्यप्राणी व शहरी माणसांना घाबरणारे आदिवासी बांधव. अशा स्थितीतही डॉ. मंदाकिनी यांनी प्रकाशरावांना उमेदीचा प्रकाश दिला. बाबा आमटे यांनी त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आणि सून डॉ. मंदाकिनी यांना हेमलकसाला सोडून दिले ते तिथेच आयुष्य खर्ची घालण्यासाठी. मूलभूत सुविधांचा अभाव, अशिक्षितपणामुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले नागरिक, अस्ताव्यस्त राहणीमान आदी महाभयंकर समस्यांना तोंड देत या भागातील आदिवासी जीवन जगत असल्याचे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या निदर्शनास येत होते.

राज्यात गडचिरोली जिल्ह्याची ओळख अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त अशी आहे. ७८ टक्के जंगलाने व्याप्त असलेल्या जिल्ह्यातील दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अज्ञान व अंधश्रद्धेच्या खाईत जीवन जगणार्‍या आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथे ४0 वर्षांपूर्वी दाखल होऊन या भागातील दीनदुबळय़ा व गरीब आदिवासींना आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.

या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे कसे? असा प्रश्न आमटे दाम्पत्यापुढे होता. अशिक्षितपणामुळे या भागातील आदिवासींना मराठीचीही जाण नव्हती. आरोग्यसेवा, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शासन-प्रशासन आदींपासून हे आदिवासी दूर होते. डॉ. आमटे दाम्पत्याला गोंडी भाषा येत नसल्याने आदिवासींना सेवा कशी पुरवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. आमटे दाम्पत्य व आदिवासी नागरिकांमध्ये भाषेचा अडथळा होता. या परिस्थितीवर मात करून डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींशी संवाद साधून गोंडी-माडिया भाषा अवगत करण्याचा प्रय▪केला. यात आमटे दाम्पत्याला यश आले. हळूहळू सर्व परिस्थितीवर मात करून या भागातील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्याचे मोठे कार्य आमटे दाम्पत्याने केले.

आदिवासी नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांचे रक्षण करून त्यांनाही आपल्या जवळचे करून घेतले. २३ डिसेंबर हा लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन असून २४ डिसेंबर हा डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस. २५ डिसेंबरला मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस तर २६ तारखेला बाबा आमटेंचा जन्मदिवस आहे. बाबांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणूनही साजरे केले जाणार आहे. २३ ते २६ डिसेंबर हे चार दिवस लोकबिरादरी प्रकल्पासाठी आनंदपर्वणीच असून यावर्षी दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहे. लोकसेवेचा व्रत घेतलेली ही बिरादरी काही वेगळीच आहे. आदिवासींसह वन्यप्राण्यांना माणूसपण देण्याचे काम डॉ. प्रकाश आमटे यांनी केले आहे.