साडे सात लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्‍क

0
21

1013 मतदान केंद्रावर 4556 मतदान अधिका-यांची नियुक्‍ती
2026 ई.एम.व्‍ही. मशीनचा होणार वापर
वर्धा,दि. 31 :जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून यानिवडणूकीमध्‍ये एकूण 7 लाख 60 हजार 454 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 3 लाख 95 हजार 506 पुरुष मतदार असून 3 लाख 64 हजार 967 महिला व 11 इतर मतदार आहेत. 21 जानेवारी रोजी हीं यादी आलेल्या हरकती व आक्षेप निकालात काढून अद्यावत करण्यात आली आहे.या निवडणूकीसाठी तालुकानिहाय मतदारांची संख्‍या व मतदान केंद्र याप्रमाणे आहे. आष्टी 51 हजार 914 मतदार व 68मतदान केंद्र, कारंजा 62 हजार 243 मतदार असून मतदान केंद्र 87 आहेत. आर्वीमध्‍ये मतदारांची संख्‍या 82 हजार 683 असून मतदान केंद्र 115 आहेत, सेलू 84 हजार 645 मतदार असून 111 मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक मतदाराची संख्‍या वर्धा तालुक्‍यामध्‍ये 2 लाख 7 हजार 977 असून 255 मतदान केंद्र आहेत, समुद्रपूर 86 हजार 1 मतदार तर 141 मतदान केंद्र , देवळी 84 हजार 533 मतदारासाठी 110 मतदान केंद आहे. आणि हिंगणघाट मध्‍ये 1 लाख 458 मतदार असून 126 मतदान केंद्र आहेत. जिल्‍हयात एकुण 1 हजार 13 मतदान केंद्र आहेत.
यानिवडणूकीसाठी आठही तालुक्‍यामध्‍ये 4 हजार 460 कर्मचा-यांची मतदान पथकासाठी सेवा घेण्‍यात आली आहे. यामध्‍ये 1 हजार 116 केंद्राध्‍यक्ष असून 3 हजार 344 मतदान अधिकारी आहेत. याशिवाय 96 क्षेत्रिय अधिकारी राहणार आहे. मतदानासाठी एकुण 2 हजार 430 ई.व्‍ही.एम. मशीनची आवश्‍यकता असून त्‍यापैकी 2 हजार 26 ई.एम.व्‍ही. मशीन प्रत्‍यक्ष मतदान केंद्रावर लागणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. जिल्हा परिषद साठी 3 लाख रुपये तर पंचायत समिती साठी 2 लाख रुपये खर्च मर्यादा आहे. निवडणूक खर्चाबाबत उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असून खर्चाचा हिशोब वेळच्या वेळी सादर करावयाचा आहे.
निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार हे वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, आणि देवळी तालुक्यासाठी राहणार आहेत, तर कारंजा, आर्वी, आष्टी,सेलू या 4 तालुक्यांसाठी भंडारा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे असणार आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्धा उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकार, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, समुद्रपूरसाठी उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, देवळी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, कारंजासाठी भंडारा चे सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. , आर्वी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, आष्टी साठी उपजिल्हाधिकारी स्वप्नील तांगडे, सेलू साठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे राहणार आहेत.