पिकांसाठी जलयुक्त शिवार ठरणार वरदान

0
10

नागपूर,berartimes.com दि. 11 – काटोल तालुक्‍यातील जलयुक्त शिवाराची कामे वनविभागासह इतर विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. यामुळे 789 टीसीएम पाणीसाठा झाला. कळमेश्‍वर येथील जलयुक्त शिवारामुळे पाण्याचे स्रोत वाढले. परिणामी, शेतकऱ्यांनाच नाही, तर गुरेढोरे व वन्यजीवांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.शेतीतील विहिरींची पाणीपातळी वाढविण्यासाठी अस्तित्वात असलेल्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्याचा दृष्टीने वनविभागाच्या क्षेत्रात खोल सलग समपातळी चर, साठवण तलाव, दगडी बंधारे, गॅबियन बंधारे, नाला खोलीकरण व लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे आदी कामे केली. त्यामुळे तलावात, चरांत, नाल्यात व आजूबाजूच्या विहिरीतील पाणीपातळी वाढली आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची मदत झाली. तसेच आता उन्हाळ्यात गुरेढोरे व वन्यप्राण्यांची गरज भागविण्यात मदत होणार आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
काटोल येथील वनविभागाचे क्षेत्र वरील बाजूस उताराचे असल्याने जमिनीची धूप झाल्याने पावासाची कामे वेगाने वाहून तलावात गाळ जमा होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली. कळमेश्‍वर येथेही कामे झाली आहेत. 2015-16 वर्षांपासून या योजनीची प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली. त्यात काटोल, कळमेश्‍वरसह इतर तालुक्‍यांतील गावांचा समावेश केला. या गावात वनखात्याने गावकऱ्यांशी चर्चा केली. गावातील पाण्याबाबतच्या अडचणी समजावून घेऊन वनविभागाचे असलेले डोंगराळ उताराचे क्षेत्र, जमिनीचा पोत, पर्जन्यमान, पाण्याचा वापर या बाबी विचारात घेऊन आराखड्यांमध्ये कामे करण्याचे निश्‍चित केले.