शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी चौधरी

0
19

भंडारा दि. 28 :: जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली. असून लोकसहभागातून शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केल्या.जलयुक्त शिवार सन २०१७-१८ चा गाव आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व यंत्रणांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवन संरक्षक उमेश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, अभियान राबवितांना जास्तीत जास्त लोकसहभागावर भर देण्यात यावा. गावातील शिवार फेरी आटोपलेली तसेच अजून बाकी आहे. त्या गावांचा शास्त्रोक्त पध्दतीने आराखडा तयार करा. पाण्याचा ताळेबंद तयार करा. अडचणी आल्यास तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सर्वांनी गाव पातळीवर चमू तयार करावी. या ५६ गावांमध्ये जी जलयुक्त शिवारची कामे होणार आहे. त्यांची पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या कामांसाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करावे व जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा, जी गावे चांगली कामे करतील त्या गावांना पारितोषिक देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी रब्बीमध्ये चांगले नियोजन केले तर चांगले उत्पादन येऊ शकते. शिवार फेरी ज्या गावात झाले नसतील तर ते करावे. जलयुक्त शिवार अभियानाचे आराखडे १० मार्चपर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. नलिनी भोयर यांनी भू-गभार्तील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी उपलब्ध करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे या बाबत माहिती दिली. तसेच अस्तित्वात असलेले व निकामी असलेले पाण्याचे स्त्रोत याबाबत जाणीव जागृती करणे, पाणलोट विकासाची कामे सिनाबां, विहिर पुनर्भरण, कालवा दुरुस्तीची कामे करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान तंत्रशुध्द पध्दतीने राबविण्यासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे आवश्यक आहे. तसेच नव्याने कामे हाती घेवून ते आराखडयात घ्यावे, दुरुस्तीची कामे सुध्दा यात घ्यावे, असे त्या म्हणाल्या. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ मध्ये वर्षी ८६ गावे तर सन २०१६-१७ मध्ये ५९ गावे निवडली होती. तसेच सन२०१७-१८ मध्ये ५६ गावे निवडण्यात आली असून आतापर्यंत एकूण ३७ हजार ७५५ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे व १६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यशाळेत तांत्रिक पध्दतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे व्हावीत यादृष्टीने तालुका कृषि अधिकारी किशोर पात्रीकर व वरीष्ठ भूवैज्ञानिक श्री. भुसारी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. उपस्थित सरपंचांनी त्यांच्या समस्या मांडल्या, त्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेकरीता वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शाखा अभियंता, सरपंच उपस्थित होते.