मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

0
7

पणजी, दि. 14 – गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पर्रीकरांसोबत आणखी 13 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकरांसोबत भाजपाच्या फ्रान्सिस डिसुजा, पांडुरंग मडकेकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर, मनोहर त्रिंबक आजगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई, विनोद पालेकर, अपक्ष गोविंद गावडे, रोहन खवंटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पर्रीकरांना आणखी दोन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. चर्चिल आलेमाव आणि प्रसाद गावकर मनोहर पर्रीकरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता पर्रीकरांकडे एकूण 23 आमदारांचा पाठिंबा आहे.
गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र काँग्रेसची याचिका फेटाळत गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मनोहर पर्रिकर यांचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून लावण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला धारेवर धरले होते.