राजकीय ध्रवीकरणाची पुन्हा आवश्यकता- डॉ. खुशाल बोपचे

0
23

नवीदिल्ली,03 (berartimes.com)- स्वातंत्र्यानंतर देशात अनेक सरकार स्थापन झाली. परंतु, ओबीसी हिताचे निर्णय एकाही सरकारने घेतलेले नाही. याउलट जाती-धर्माच्या नावावर ओबीसी समाजात फूट पाडून त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतली. मागास जातीतील पुढाऱ्यांसह समाजसुधारकांना जातीचे चौकटीत बंदिस्त करून धूर्त उच्चजाती आजही फायदा लाटत आहेत. ओबीसींना त्यांचे हक्क मिळवायचे असतील तर पुन्हा एकदा राजकीय ध्रुवीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी नवीदिल्ली बोलताना केले.
ते नवीदिल्ली येथे काल रविवारी (ता.१२)आयोजित ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी खा. शरद यादव,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर, सुनील सरदार, प्रा. श्रावण देवरे, प्रा. दिलीप मंडल, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, श्रीमती यादव, अ‍ॅड. उमा जायस्वाल, जेएनयूच्या प्राची पाटील, बिहारहून राजेश कुमार, दिल्लीचे जुगेश करोटिया, मनोहर मेश्राम, यवतमाळचे हनुमान किन्नाके,अ‍ॅड.अमित सिंग, नई दुनियाचे सुनील जैन,अ‍ॅड. एम आय प्रेमी, विजय याझिक,धर्मेंद्र कुशवाह ग्वाल्हेर,सरिका सागर दिल्ली,जेएनयु दिलीप यादव,मुलायम यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जेएनयूच्या प्राची पाटील म्हणाल्या की, देशातील विद्यापीठांमध्ये ओबीसी महिलांचा सहभाग जवळपास शून्य आहे. याचा सरळ अर्थ ओबीसी महिला अद्यापही विकासापासून कोसोदूर आहेत. ओबीसी महिलांना महत्वाच्या पदांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र या देशात पूर्वापार रचले जात आहेत. जर निर्णय घेणाऱ्या महत्त्वाच्या पदांपासून बहुसंख्य असलेल्या ओबीसी महिला वा पुरुष यांना दूर ठेवले जात असेल तर हा देश पुढे कसा जाऊ शकेल? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आज स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या महिला महत्त्वाच्या पदावर आहेत आणि एकीकडे आरक्षणाविरुद्ध अपप्रचार करून दुसरीकडे त्यांच्याच महिला आरक्षणाच्याच भरवशावर राजकारण आणि अर्थकारणात मोठ्या प्रमाणावर शिरकाव करीत आहेत. देशात असेच सुरू राहिले तर आपण निर्णयक्षम पदांपासून दूर तर राहूच, मात्र गुलामीच्या खोल खाईत पडण्यापासून आपणाला कोणी रोखणारा सुद्धा कोणी नसेल. यासाठी सर्व ओबीसी समाजाने एका छताखाली आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे, असे आवाहनही प्राची पाटील यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की, आज ओबीसींच्या समस्येची जाण असलेला प्रत्येक जण ओबीसींच्या मागासपणाची कारणे जाणतो आहे. तो अन्यायाविरुद्ध सुद्धा लढत आहे. पण आपण जोपर्यंत एका राष्ट्रीय स्तरावर एकत्र लढा देत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला यश येणे दुरापास्त आहे. त्यासाठी जातीचे समीकरणे तोडून ओबीसी या एका प्रवर्गाच्या बॅनरखाली येणे गरजेचे आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महाधिवेशाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, त्याचे जाहीर आमंत्रण मी आजच तुम्हाला देतो, असेही डॉ. बोपचे म्हणाले. यावेळी देशभरातून आलेल्या ओबीसी नेत्यांनी या बैठकीला आपली हजेरी लावली होती.