उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

0
12

लखनौ, दि, ४ – उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांचे ३० हजार ७२९ कोटींचे कर्ज माफ होणार असून, बुडीत कर्ज धरून एकूण ३६ हजार ३५९ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे, या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच्या आपल्या वचननाम्यात भाजपाने सत्तेवर आल्यास लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजपाने केली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही भाजपाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने भाजपा सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पण आज अखेर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्र्यांना पाठवलेल्या अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात वर होती. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे दोन कोटी १५ लाख शेतकरी असून, त्यातील १ कोटी ८३ लाख शेतकरी अल्पभूधारक आणि ३० लाख शेतकरी छोटे आणि लहान आहेत. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारला ३६ हजार ३५९ कोटींची तरतूद केली आहे.
त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अँटी रोमिओ स्कॉड, राज्यात नवी उद्योग नीती, अवैध कत्तलखाने अशी प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले आहेत.