शिवसेना खासदारांची नागरी उड्डाणमंत्र्यांना धक्काबुक्की?

0
7

नवी दिल्ली, दि. 6 – एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड अखेर संसदेत पोहोचले आहेत. लोकसभेत गायकवाडांच्या प्रकरणावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ 11 वाजता स्थगन प्रस्ताव ठेवणार आहेत. हा स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन अमान्य करण्याची शक्यता आहे. मग त्यावेळी त्यांना झिरो अवरमधे बोलू देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात येईल. त्याआधी संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयात खासदारांची बैठक झाली. खासदार रवींद्र गायकवाड सध्या संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी आहेत.
शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड विमानातील चप्पलमार प्रकरणानंतर आज संसदेत दाखल झाले होते. चप्पलमार प्रकरणावरुन संसदेतही गदारोळ पाहायला मिळाला. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं. दरम्यान, गायकवाड यांनी सभागृहात माझ्यासोबत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. तपास न करताच माझी मीडिया ट्रायल सुरू करण्यात आली, ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी संसदेत म्हटले.
या सर्व गोंधळादरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपति राजू यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. शिवसेना खासदारांनी गजपती राजूंनी घेराव घातला. व त्यांना धक्काबुक्कीही करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या सर्व प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह , स्मृती इराणी यांच्यासहीत अन्य मंत्र्यांनी मध्यस्थी केली.