ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणचा ‘विशेष मदत कक्ष’

0
42

मुंबई,दि.11:-महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी आणि ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.महावितरणच्या नवीन ग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि आपल्या नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार अशा ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.
ग्राहकांना नवीन वीजजोडणी घेताना अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी या कक्षाद्वारे संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करून ग्राहकांना सुलभतेने वीजजोडणी मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय ग्राहकांच्या नावात बदल करण्याबाबतच्या तक्रारींचे निराकरणही या विशेष मदत कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. पैसे भरून नवीन वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन अशा ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी मिळावी, यासाठी या ‘विशेष मदत कक्षा’द्वारे मदत करण्यात येईल.नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.