ओबीसींची जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक-खा.प्रितम मुंडे

0
7

नवी दिल्ली दि.12.-ओबीसी कमिशनला लोकसभेने घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे ओबीसींना मोठा फायदा होणार आहे असे सांगून याचा फायदा सर्व लाभार्थीना होण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे मत खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले.अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा देण्याच्या निर्णयावर बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आपली भूमिका लोकसभेत मांडली.मराठीतून अतिशय प्रभावी भूमिका मांडताना प्रथम त्यांनी ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री धवचंद गेहलोत यांचे आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, या निर्णयाने मला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची तिव्रतेने आठवण झाली. त्यांनी आयुष्यभर या निर्णयासाठी संघर्ष केला. या निर्णयामुळे राज्याच्या अधिकार कमी होतील ही भिती चुकीची आहे उलट यामुळे सर्व राज्यांत सुसूत्रता यायला मदत होणार असून याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवने गरजेचे आहे. कालेलकर समिती आणि मंडल आयोग हे जर पायरी असेल तर आजचा निर्णय हा कळस ठरणार आहे. मात्र हा कळस सोन्याचा ठरवायचा असेल तर जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
या निर्णयाला विरोध करणार्‍यांचा खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, गेली अनेक वर्ष दिल्ली ते गल्ली सरकार असताना त्यांनी काय केले असा सवाल करून त्यांच्या काळात ओबीसी समाजावर कसा अन्याय झाला हे त्यांनी आकडेवारीसह मांडले. महाराष्ट्र शासनाने ओबीसीसाठी प्रथम स्वतंत्र मंत्रालय निर्माण केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचेही आभार व्यक्त केले.