संघाच्या लेखी आता समाजकार्य हेच राष्ट्रद्रोह- कन्हैयाकुमार

0
17

नागपूरची ओळख ही संघभूमी नव्हे तर दीक्षाभूमी अशी राहिली पाहिजे

बाबासाहेबांना मानणारे बजरंगी मनुस्मृती दहन करणार का?

गोंदिया,दि.१३(berartimes.com)-देशात संघप्रणीत भाजप सरकार आल्यापासून सर्वच व्याख्या बदलल्या जात आहे. समाजाच्या हितासाठी लढणारा हा आता देशात देशद्रोही ठरवला जात आहे. विकासाच्या पोकळ बाता करणारे प्रधानमंत्री स्वकीयांच्या घोटाळ्यावर मात्र गप्प आहेत. नागपूरच्या पावनभूमीची ओळख ही संघभूमी म्हणून नव्हे तर दीक्षाभूमी म्हणून कायम होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या नावावर राजकीय पोळी शेकणारे आणि बाबासाहेबांचे अनुयायी असल्याचा देखावा करणारे बजरंगी हे चौकात येऊन मनुस्मृती जाळण्याची हिंमत दाखवू शकतील काय? असा परखड सवाल विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला गोंदिया येथे आयोजित एका कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांसह कट्टरपंथीयांना केला.
ते आज(दि.13) जयस्तंभ चौकात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत मेश्राम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विरा साथीदार, विश्वजित, मिलींद गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भाजपच्या एका गटाने पोलिस मुख्यालयासमोर नारेबाजी करून विरोध प्रदर्शित करून गोंधळ घातला. परंतु, पोलिसांन येथे व्हीआयपी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.मात्र, कन्हैयाकुमारला भाजपकडून कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आला नाही,तर भाजपच्या नावाचा वापर करीत काही युवकांच्या संघटनेने असा प्रकार केल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.मात्र जे काही युवक बघावयास मिळाले ते सर्व भाजप म्हणा कि हिंदुत्ववादी संघटनांशी जुळलेले असल्याचे दिसून येत होते.झालेल्या प्रकारानंतर काही संघटना व राजकीय पक्ष कुठे तरी या प्रकरणातून आत्ता आपले हात काढण्याचे प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे
पुढे बोलताना कन्हैयाकुमार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी या देशातील दलितांसह शोषित-मागास लोकांना मानवर करून जगण्यास शिकविले. मनुस्मृतीनुसार राज्य करणाऱ्यांनी तर केवळ मागास व दलितच नाही तर स्त्रियांना सुद्धा जनावरांप्रमाणे वागणूक दिल्याचे दाखले आहेत. विदर्भातील नागपूरच्या मातीत बाबासाहेबांनी धर्मांध शक्तींचा विरोध झुगारत शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्या पावनस्मृती या मातीतून पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात आहे. नागपूरला संघभूमी अशी ओळख देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने हाणून पाडला पाहिजे. नागपूरची ओळख ही दीक्षाभूमी म्हणून कायम राखण्यासाठी प्रत्येकाने जिवाची बाजी लावली पाहिजे, असे भावनिक आवाहनही यावेळी कन्हैयाकुमार यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
पुढे बोलताना ते आणखी म्हणाले की, आज संघाच्या इशाऱ्यावर चालणारे मोदींचे सरकार हे सबका साथ, सबका विकास म्हणत जनतेला मृगजाळ्यात ओढत आहेत. मिडीयाचा वापर करून सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या विरोधात चुकीचा प्रसार करून वातावरण घाण करीत आहेत. माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करणारे या सरकारातील राजनाथसिंह गेल्या वर्षभरापासून अद्यापही दोषारोप पत्र सादर करू शकले नाही. शोषितांची सुरक्षा लक्षात ठेवावी लागणार आहे. जिथे जिथे समाजकार्याचे कॅम्प्स आहेत, तेथेतेथे राष्ट्रद्रोहाची तुतारी वाजविण्याचा एककलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.
भाजपच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सामील आणि स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आपल्याच समाजातील काही बजरंगी कार्यरत आहेत. त्यांना पुढे करून संघातील मंडळी आंबेडकरवाद्यांना गुंगीचे औषध देऊ पाहत आहेत. अशा मंडळीपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. अशा बजरंगीना मनुस्मृती जाळण्याची तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल विचारला पाहिजे.
डॉ. आंबेडकर हे ब्राम्हणवाद आणि भांडवलवादाच्या विरोधात होते. मग बाबासाहेबांच्या नावाची आळवणी करून मतांचा जोगवा मागणारे आमदार आणि खासदारांनी भांडवलदारांकडे असलेल्या जमिनीच्या समान वाटपासंबंधी कधी आवाज का उठवला नाही? अशा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना केला. ते पुढे म्हणाले की, शोषित समाजाने एकत्र येऊन जातीतोडो अभियान राबविण्याची खरी गरज आहे. मोदी हे केवळ विकासाच्या वल्गना करीत आहेत. आपल्याला विरोधकच नको, अशी त्यांची धारणा आहे. प्रधानमंत्री हे जर भ्रष्टाचार विरोधक असते तर त्यांनी मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील दोषींना सुद्धा समान न्यायाने वागविले असते. भ्रष्टाचार दूर करण्याच्या नावावर निवडून सत्तेत आलेली मंडळी ही आपल्या पक्षातील भष्ट्राचाऱ्यांना सोईस्करपणे पाठीशी घालत आहे.
बेरोजगारीच्या मुद्यावर बोलताना कन्हैयाकुमार म्हणाले की, सबका साथ… म्हणणारी मंडळी अ‍ॅण्टीरोमिओ स्कॉट बनवण्यात मश्गूल आहे.पण त्यांचेकडे अ‍ॅण्टी बेरोजगारी स्कॉट तयार करण्यासाठी वेळ नाही. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याऐवजी त्यांना चुकीच्या मार्गाकडे वळविले जात आहे. मोदींनी देऊ केलेले दोन कोटी रोजगार देशातील युवकांना केव्हा मिळणार, हा गंभीर प्रश्न आहे. सत्तेची मस्ती जिरवायची असेल तर आपली मानसिकता बदलविणे गरजेचे आहे असे सांगत संविधानाद्वारेच देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेता येते, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.