मोदींच्या उक्ती आणि कृतीत अंतर-खा.शरद यादव

0
7

नागपूर दि.16(berartimes.com):डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ देणार नाही, असे प्रतिपादन जनता दल युनायटेडचे प्रमुख खा. शरद यादव यांनी केले. आवाज इंडिया टीव्ही चॅनलतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व चॅनलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दलित, शोषित, बहुजन समाजाने या देशातील शासनकर्ती जमात बनावे, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. मात्र त्याचा योग्य वापर होत नसल्याची खंत यादव यांनी व्यक्त केली. तसेच, सबका साथ सबका विकास असा नारा पंतप्रधान देत असले तरी त्यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१५ एप्रिल)कस्तुरचंद पार्कवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘आरक्षणाचे राष्ट्रनिर्मितीत योगदान’या विषयावर खा. यादव यांनी भूमिका मांडली.

यावेळी विचारमंचावर अमन कांबळे, गुणवंत देवपारे, सुनील सरदार, सहाय्यक आयकर आयुक्त अरविंद सोनटक्के, पी.एस. खोब्रागडे,राजीव झोड़पे आणि आवाज इंडियाचे प्रीतम बुलकुंडे  आदी उपस्थित होते. शरद यादव म्हणाले, सर्व समस्येचे मूळच जाती व्यवस्थेत आहे. जोपयर्ंत जातीव्यवस्था नष्ट होणार नाही, तोपयर्ंत दलित, शोषितांवरील अन्याय सुरूच राहील. बाबासाहेबांना समताधिष्ठित समाजरचनेसाठी शोषितांनाही तयार करायचे होते. बाबासाहेबांमुळेच आज एकविसाव्या शतकात समताधिष्ठित राज्यघटनेची फळे आपणास चाखायला मिळत आहेत. धर्माचे अधिष्ठान बाजूला ठेवून समताधिष्ठित लोकशाहीचा केलेला स्वीकार आणि त्याला दिलेले राज्यघटनेचे अधिष्ठान यामुळेच आज देशाची मान जगात उंचावली. मात्र आज संविधान धोक्यात आले आहे. संविधानाला तोडण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. सबका साथ सबका विकास या मंत्राचा नरेंद्र मोदी जप करीत आहे. परंतु त्यांची कृती वेगळीच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला दिलेली आश्‍वासने अद्याप पाळलेली नाहीत, अशी टीकाही यादव केली.‘जय भीम’ या गीताच्या लेजर शोचे उद्घाटनही करण्यात आले. गायक संतोष पावा आणि स्पेनची गायिका मि लिली हिने ‘सम्बुद्धा’ अल्बमचे सादरीकरण केले. संचालन डॉ. राजेंद्र फुले यांनी केले.