मोदी आजपासून 4 देशांच्या दौऱ्यावर, 6 दिवसांत 20 कार्यक्रमांत सहभाग

0
6

नवी दिल्ली दि. 29 –पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून यंदाच्या सर्वात महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मोदी २९ मे ते ३ जूनपर्यंत युरोपीय देशांना भेट देतील. जर्मनी, स्पेन, रशिया, फ्रान्सला ते भेट देतील. कूटनीती व आर्थिक पातळीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. आर्थिक, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अणु ऊर्जा हेदेखील दौऱ्याच्या विषयपत्रिकेवर आहेत.
युरोपीय संघ-भारत मुक्त व्यापार करारावरही या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे. त्याशिवाय मेक इन इंडिया प्रकल्पा अंतर्गत गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे निमंत्रणही माेदी या दौऱ्यात देतील. २९ व ३० रोजी मोदी जर्मनीला भेट देतील. त्यानंतर ते स्पेनला जातील. १ व २ जून रोजी रशियाचा दौरा करतील. २ जूनच्या रात्री मोदी फ्रान्सला जाणार आहेत. तेथे फ्रान्सचे नूतन राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांचा ते पाहुणचार घेतील. त्यामुळेच कूटनीती व राजकीयदृष्ट्या मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. त्यानंतर मोदी कझाकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होतील. तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील. २६ ते २८ जून मोदी अमेरिकेला जातील. मोदी-ट्रम्प यांच्यातील ही पहिलीच भेट असेल. मोदी जुलैत इस्रायलला जातील. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरतील.