२०२४ मध्ये सर्व निवडणूका एकत्रच होणार ?

0
7
नागपूर, दि.29 –  भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी भाजपाचे आमदार व पदाधिका-यांची बैठक घेतली. गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना देत असताना २०२४ साली लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रच होण्याची शक्यता असलल्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शाह सध्या देशातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक पदाधिका-यांशी संवाद साधत आहेत. भाजपातर्फे १ जूनपासून विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा अचानक नागपूर दौरा ठरला.
नागपुरात येताच शाह यांनी अगोदर नागपुरातील आमदार, पदाधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती हेदेखील उपस्थित होते. नागपूर व विदर्भातील पक्षविस्तारासंदर्भात त्यांनी पदाधिका-यांकडून जाणून घेतले. तसेच त्यांना विविध सूचना केल्या. २०१९ च्या निवडणूकांसोबतच २०२४ च्या टप्प्याकडे लक्ष देऊन पक्षबांधणीला लागा, अशी सूचना केली. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न नागपुरातील पदाधिका-यांनी शाह यांना केला. एकत्र निवडणूका घेणे शक्य आहे. मात्र लोकसभेसोबतच इतर निवडणूका घेण्यासाठी सर्वांची कालमर्यादा विचारात घ्यावी लागले. ही मोठी प्रक्रिया आहे. ती होईल तेव्हा होईल. मात्र असे झालेच तर आपली तयारी हवी या दृष्टीने संघटन बांधणी करायला हवी, असे शाह यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र शाह यांनी कुठलेही स्पष्ट संकेत दिले नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मात्र वरील वृत्ताला दुजोरा दिला.