कारका जंगलात चकमक, पोलिसांनी केला भूसुरुंग निकामी

0
21

गडचिरोली, दि..३१: कारवाफा उपविभागांतर्गत जारावंडी पोलिस मदत केंद्रातील कारका जंगलात काल दुपारी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांनी पेरुन ठेवलेला भूसुरुंग निकामी करुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनियुक्त अपर पोलिस अधीक्षक हरी बालाजी व उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे जवान काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास कारका जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांना १ सिंगल बोअर रायफल, ३ क्लेमोर माईन्स, पिट्टू, दैनंदिन वापराचे साहित्य, पुस्तके, बॅनर इत्यादी साहित्य आढळले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी क्लेमोर माईन्स जागेवरच निकामी केले.