भंडाऱ्याची महिला बनली पहिली वनपरिक्षेत्राधिकारी

0
14

भंडारा ,दि.01- : आज महिलांनी विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ओळख निर्माण करीत आहेत. त्यात आता शासकीय अधिकारीही मागे नाहीत. भंडारा वन विभागाच्या इतिहासात वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) या पदावर पहिल्यांदा जिल्ह्यातील एक महिला अधिकारी रुजू होत आहे. आरती रमेश ठाकरे असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या लवकरच साकोली वन कार्यालयात रूजू होणार आहेत.

सन २००६ मध्ये आरती ठाकरे या वन विभागात वनपाल म्हणून रूजू झाल्या. त्यावेळी त्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव वनपाल होत्या. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी (वाही आगार), साकोली वनक्षेत्र, गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी क्षेत्रात सेवा बजावली आहे. विद्यमान स्थितीत त्या कोका अभयारण्याच्या उसगाव क्षेत्रात कार्यरत आहेत. दि. २९ मे रोजी वन विभागाने राज्यातील ७८ वनपालांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीची यादी जाहिर केली. त्यात आरती ठाकरे यांची पदोन्नती करून त्यांच्यावर साकोली वनपरिक्षेत्र कार्यालयाची धूरा सोपविण्यात आली आहे. त्या लवकरच रूजू होणार आहेत. तथापि, भंडारा जिल्ह्यातील त्या पहिल्या वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत.