सडक/अर्जुनी तालुक्यात रोहयोतून ११७५० कुटुंबांना रोजगार

0
11

गोंदिया,दि.१ : मागेल त्याला काम व कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सडक/अर्जुनी तालुक्यात यशस्वी ठरली आहे. या योजनेअंतर्गत ५० दिवसामध्ये सडक/अर्जुनी तालुक्यातील ११७५० कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मजुरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मजुरांना रोजगार मिळणे ही बाब आम असली तरी यात बहुतांश आदिवासी बांधव तसेच शेतकरी बांधव सुध्दा रोजगारासाठी रोहयोच्या कामावर असल्याचे समजते.
उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्प्यात असतांनाच तालुक्यातील मजुरांना कामे उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत या मजुरांकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. संबंधितांना यातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. ग्रामपंचायतीकडून मजुरांचे जॉब कार्ड मागविण्यात आले. या आधारावर सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत १४ हजार ७५० मजुरांची नोंदणी करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षरित्या ११७५० कामावर असलेल्या मजुरांना मजूरीपोटी ३ कोटी १६ लक्ष रुपये अदा करण्यात आले. सर्व मजुरांची मजूरी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. या प्रणालीत आधारकार्डची भूमिका महत्वाची ठरली आहे.
कामावर उपस्थित असलेले मजूर पुढील प्रमाणे. तलाव खोलीकरण २३ कामे ५३१२ मजूर, पांदन रस्ता १३ कामे २४१९ मजूर, भातखाचर २३ कामे ६७५ मजूर, सिंचन विहिर २ कामे ३४ मजूर, गुरांचा गोठा ३ कामे ५४ मजूर, वैयक्तीक शौचालय २६ कामे १३८ मजूर, घरकूल १६ कामे ६४ मजूर. दररोज एकूण १०६ कामावर ८६९६ मजुरांची उपस्थिती आहे. विशेष म्हणजे गाळमुक्त तलावाच्या कामावर २३ कामे ५३१२ मजूर उपस्थिती आहे. डासमुक्त तालुक्याचे काम ६ ग्रामपंचायतीने हाती घेतले असून ५८ कामे २३४ मजूर कामावर उपस्थित आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवडीचे काम सुध्दा हाती घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदकाम सुरु आहे.