मनरेगाच्या यशस्वी अभियानासाठी गोंदिया जिल्ह्याला पुरस्कार

0
10

गोंदिया,(berartimes.com)दि.04-केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना(मनरेगा) आपपल्या राज्यात यशस्वी राबवून ही योजना लाेकाभिमुक केल्याबद्दल ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने काही राज्यसरकारांसह यशस्वीरित्या काम करणार्या जिल्ह्यांची महात्मा गांधी (मनरेगा)पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पंचायत समितीतंर्गत येणार्या चिखली ग्रामपंचायतीची विशेष निवड करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यात यशस्वीपणे ही योजना राबविल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे हा पुरस्कार स्विकारणार आहेत.पुरस्कारासाठी योजनेचे जिल्हास्तरावरील नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा उल्लेख पुरस्कार स्विकारण्यासाठी शासनाने ठरविले आहे.

केंद्रसरकारच्यावतीने मनरेगाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी संपुर्ण राज्यातील आढावा घेऊन पुरस्काराची निवड करतांना महाराष्ट्र सरकार मात्र या योजनेत अपयशी ठरले आहे.राज्य म्हणून या योजनेत एकही पुरस्कार प्राप्त करु शकले नाही.याऊलट पश्चिम बंगाल,छत्तीसगड,सिक्कीम व राजस्थान,तेलंगना ,अांध्रप्रदेश,जम्मु काश्मिर तर आधार लिकिंगमध्ये पांडेचेरी,केरला,हरयाणा व पंजाब सरकारने पुरस्कार पटकावले आहे.हा पुरस्कार सोहळा येत्या 19 जून रोजी नवी दिल्ली येथे वितरित करण्यात येणार आहे.गोंदिया जिल्ह्यात मनरेगा योजनेचे यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद,तहसिल कार्यालया,पंचायत समितीसह इतर विभागांशी समन्वय साधून योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजनात कुठेही अडचण येऊ नये यासाठी मनरेगा विभागाचे उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे यांनी केलेले कार्य सुध्दा महत्वाचे ठरले आहे.