गोंडवाना विद्यापीठाची २० वरिष्ठ महाविद्यालये बंद

0
10

चंद्रपूर दि.१७ : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात महाविद्यालयाचे संलग्नीकरण न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याची पाळी आली आहेत. विद्यापीठाच्या विद्वत व व्यवस्थापन परिषदेने ही वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला असून गोंडवाना विद्यापीठाने नुकतीच अधिसूचना प्रकाशित केली आहे. या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सन २००९ ला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची स्थापना करण्यात आली. २०१० पासून विद्यापीठाच्या कामकाजाला सुरूवात झाली. या विद्यापीठात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दीडशेच्या जवळपास वरिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या ध्येय धोरणानुसार वरिष्ठ महाविद्यालयांना दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नीकरण करावे लागत असते.

मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाशी संलग्नीकरण केलेले नाही. त्यामुळे ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने २५ एप्रिल २०१७ ला बाब क्र. १६ व १७ अन्वये तर २८ एप्रिल १०१७ ला व्यवस्थापन परिषदेने बाब क्र. १४ मधील ५, ६, ७ अन्वये घेतला आहे. या निर्णयानुसार शैक्षणिक क्षेत्र २०१७-१८ पासून ही वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद करण्यात आलेली वरिष्ठ महाविद्यालये

विद्यापीठाशी संलग्नीकरण न केल्याने बंद करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये श्री संत शुन्योजी महाराज शिक्षण महाविद्यालय, गडचांदूर, शंकरय्या देशमुख महाविद्यालय, वरोरा, राजीव गांधी कॉलेज आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन चिमूर, आचार्य विनोबा भावे कॉलेज आॅफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स सिव्हिल लाईन्स चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरोरा आचार्य विनोबा भावे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर, आचार्य विनोबा भावे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी, जैनुद्दीन जव्हेरी महाविद्यालय, तुकूम, फेअरीलॅन्ड कॉलेज आॅफ सायन्स कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट भद्रावती, लोकमान्य टिळक महाविद्यालय चंद्रपूर, भाऊराव पाटील चटप शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राजुरा, श्रीमती कमलताई वडेट्टीवार शिक्षण महाविद्यालय, सिंदेवाही अब्दुल अजीज धम्मानी महाविद्यालय, नागभीड, चंद्रपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर, जिजामाता कॉलेज आॅफ कम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी सुमठाना, भद्रावती, इंदिरा गांधी महाविद्यालय चंद्रपूर, स्व. भिवाजी वरभे वाणिज्य अ‍ॅन्ड सायन्स वरिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर, निरंजन ज्योतिबा फुले महाविद्यालय, चंद्रपूर, लक्ष्मीबाई मामुलकर महिला महाविद्यालय राजुरा या महाविद्यालयांचा समावेश आहे.