१६ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक

0
9

गडचिरोली,दि..१७: महाराष्ट्र-छत्तीसगड-ओरिसा राज्यांमध्ये कार्यरत जहाल नक्षलवादी पवन उर्फ सोमा फोदा वेलादी(३५) यास गडचिरोली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.मूळचा छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील परसेगुंडी येथील रहिवासी असलेला पवन उर्फ सोमा वेलादी हा गरियाबंद डिव्हीजनल कमिटीचा सदस्य असून, त्याने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील प्लाटून क्रमांक ३, मिलिटरी दलम, बिजापूरमधील सांड्रा दलम व प्लाटून क्रमांक २२ मध्ये काम केले आहे. वरिष्ठ नक्षल नेत्यांचा अंगरक्षक म्हणूनही तो कार्यरत होता. गेल्या दोन दशकांत विविध हिंसक घटना, पोलिस व सामान्य नागरिकांच्या हत्या, भूसुरुंगस्फोट यामध्ये त्याचा सहभाग होता. डीव्हीसी पवन वेलादीवर १६ लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गडचिरोली व बिजापूर सीमेवर कार्यरत सांड्रा दलममधील ३ नक्षल्यांना एप्रिल महिन्यात नक्षल अभियानादरम्यान गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून डीव्हीसी पवनला अटक करण्यात आल्याने नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला असून, गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.