शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी-जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
8

भंडारा,दि.18 : राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने अनेकांवर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक कृती समिती भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.

जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वसाधारण शिक्षक बदलीसाठी घेतलेला शासनाने निर्णय स्थगीत करावा यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांमध्ये शिक्षकांचे पगार १ तारेखेला करावे, २००५ नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकांना पेंशन लागू करावी, पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व पदविधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी, ग्रेड वेतन लागू करावे, जिल्ह्यातील सर्व शाळांना संगणकीकृत करून नेट जोडणी करावी, जि.प. शाळांचे विद्युत बिल शासनाने भरावे, केंद्राची पुनर्रचना करून केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक विषय शिक्षकांमधून भरावे, चार टक्के सादील खर्चाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करावी, विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता ५०० रूपये द्यावे, मुलींचा उपस्थिती भत्ता १० रूपये करावा, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांचे मानधन पाच हजार रूपये करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत शाळा उघडायची नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने शनिवारला घेतला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार २८७ विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकणार आहेत.शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या २७ जूनला जि.प. च्या सर्व शाळा सुरू होत आहेत. मात्र शिक्षकांच्या समस्या निकाली निघेपर्यंत शाळा उघडायच्या नाही, असा ठोस निर्णय शिक्षक कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला आहे.या निर्णयाचे निवेदन शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनिषा ठवकर यांना दिले आहे.