शिक्षकांना मिळणार अतिरिक्त ‘घरभाडे भत्ता

0
19

गोंदिया,दि.22-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरवार व जिल्हा सहसचिव संदिप तिडके यांच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील दालनात जिल्ह्यातील शिक्षक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर नुकतीच चर्चा करण्यात आली. यावेळी गेल्या १५ वर्षापासून रेंगाळत असलेला अतिरिक्त घरभाडे भत्त्याचा प्रश्न प्राधान्यांने सोडवून जिल्ह्यातील आठ हजार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना न्याय दिला जाईल, असे आश्‍वासन ना. बडोले यांनी दिले.
जिल्हा परिषद अंतर्गत अनेक प्रश्न शिक्षण विभाग व वित्त विभागाच्या उदासिन धोरणामुळे प्रलंबित आहेत. यामध्ये १३ आपसी जिल्हा बदली, शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करणे, अतिरिक्त घरभाडे भत्ता, पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकांना एकस्तरनुसार आगावू वेतनवाढ, पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत, वैद्यकीय पुरवणी देयकासह कार्य पुरवणी देयक अदा करणे, वर्ग १ व वर्ग २ च्या रिक्त जागा त्वरीत भरणे, सडक अर्जुनीमधील जीपीफ घोळासह अनेक प्रलंबित प्र्नश्नांवर मुंबई येथे ना. राजकुमार बडोले यांच्या दालनात चर्चा करण्यात आली.
दरम्यान, ना.बडोले यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भोसे, ग्रामविकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात भ्रमणध्वनीवर चर्चा करून मागण्यांचे गांभीर्य पटवून दिले. तसेच संबंधित विभागाला पत्र पाठवून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. तसेच स्विय सहाय्यक राज सराफ, श्री माने यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनासह संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी यासंदर्भात चर्चा व पाठपुरावा करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षापासून रेंगाळत असलेला अतिरिक्त घरभाडे भत्त्याचा प्रश्न प्राधान्यांने सोडवून जिल्ह्यातील आठ हजार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना न्याय दिला जाईल, असे आश्‍वासन ना. बडोले यांनी दिले.
दरम्यान, संघटनेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार व जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांनी थेट मंत्रालयात जावून शिक्षक कर्मचार्‍यांच्या समस्येबद्दल संबंधितांकडे पाठपुरावा केल्याबद्दल आणि ना. राजकुमार बडोले यांनी शिक्षक समितीला सहकार्य केल्याबद्दल शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल. यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, व्ही. जे. राठोड, डी. एल. गुप्ता, बी. आर.दीप, पी.आर.पारधी, सुरेश कश्यप, प्रदीप रंगारी, एन.बी.बिसेन, सतीश दमाहे, टी. आर.लिल्हारे, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, जी.एम.बैस, कैलाश हाडगे, विनोद बडोले, प्रदीप बडोले, दिलीप लोधी, बाळू वालोदे आदी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.