विद्यापिठाचा प्रताप- अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले गैरहजर

0
11

गोंदिया,दि.25 : येथील गोंदिया शिक्षण संस्थेच्या कुडवा स्थित  मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांन्या परीक्षा दिल्यानंतरही एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविल्याचा प्रकार शुक्रवारी निकाल लागल्यानंतर उघडकीस आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.तर महाविद्यालय प्रशासन मात्र सारवासारव करु लागले असून मंगळवारला विद्यापीठात जाऊन हजर विद्यार्थ्यांबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणने आहे. काम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या १९ विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने गैरहजर दाखविले. त्यात प्रणय बावणकर, हरिष बहेकार, हिमांशू मेश्राम, करण राजभार, कार्तिक यादव, मनिष उके, प्रजय बागडे, प्रखर दिक्षीत, प्रणय भगत, शंकर चिमाणी, श्रेयस ईटानकर, शुभम शरणागत, सेल्व्हन्स ऐंथोनी, रजत शेंदरे, शुभम घोष, सुभाशू बावणथडे, उदीत खोटेले, विपीनकुमार पटले, यश चांदवानी या  विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय गोंदिया येथील द्वितीय वर्षाच्या कम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ४ सेमचा ‘इंट्रोडक्शन टू मेन फेम ’ या विषयाचा पेपर दिला. त्या पेपरला गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला. शुक्रवार (दि.२३) रोजी नागपूर विद्यापीठाने निकाल जाहीर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नापास दाखविल्याने त्या विद्यार्थ्यांना धडकी भरली. त्यांनी महाविद्यालय गाठले त्यांनी यासंदर्भात प्राचार्य व विभाग प्रमुखांसोबत बोलून यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला कळविण्याची विनंती केली. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासंदर्भात माहिती महाविद्यालयातर्फे नागपूर विद्यापीठाला पाठविण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठात बसलेल्या लिपीक वर्गाच्या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना गैरहजर दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला आहे. निकाल शुक्रवारी आल्यामुळे सर्व विद्यार्थी शनिवारी महाविद्यालयात पोहचले. परंतु महिन्याचा चौथा शनिवार असल्याने विद्यापीठ बंद, रविवारची सुट्टी, पुन्हा सोमवारी रमजान ईद असल्यामुळे सलग तिन सुट्या आल्याने आपण वेळीच आक्षेप कसा घेणार या संभ्रमात विद्यार्थी आहेत.