आयोगाच्या परीक्षेसाठी हवे ‘आधार’

0
4

नागपूर,दि.27 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक भरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना  प्रोफाईल तयार करताना आधार क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. ज्या उमेदवारांची प्रोफाईल तयार आहे, त्यांना आयोगाच्या नियमानुसार त्वरित त्यात सुधारणा करणे आवश्‍यक आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. प्रोफाईलच्या माध्यमातून अतिरिक्त महत्त्वाची माहिती उमेदवारांकडून प्राप्त करण्याचा आयोगाचा विचार आहे. त्यामुळे सध्या ऑनलाइन अर्जामध्ये आयोगामार्फत काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आधार कार्ड, जातपडताळणी प्रमाणपत्र क्रमांक आणि शासन निर्णयानुसार खेळाडू आरक्षणात बदलासह काही महिन्यांपूर्वी आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईमध्ये अतिरिक्त आवश्‍यक माहिती भरावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले.

आयोगाने स्पर्धा परीक्षांकरिता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ज्या-ज्या पदांच्या जाहिराती जवळपास एक दोन महिन्यात अपेक्षित आहे. त्या त्या परीक्षांकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अपडेट करावे. निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची ओळख पटण्यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन प्रोफाईमध्ये त्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याच्या निर्णय आयोगाने घेतला. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आधार कार्ड नाही. त्यांनी त्वरित आधार कार्ड काढावे असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले. उमेदवारांना आधार कार्ड संबंधित व काही अतिरिक्त महत्त्वाची माहिती लिहिण्याची सुविधा त्यांच्या ऑनलाइन प्रोफाईमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर आधार कार्ड क्रमांक नसल्यास उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयासमोर आपली ओळख निश्‍चित करून देणे बंधनकारक राहणार आहे.