निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत- अनूप कुमार

0
17

गोंदिया, दि.३० : जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्रांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
आज ३० जून रोजी जिल्हा परिषद गोंदिया, मत्स्य विभाग आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने अदानी प्रकल्पातील सभागृहात आयोजित तलाव तेथे मासोळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री.अनूप कुमार बोलत होते.कार्यशाळेचे उदघाटन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांची उपस्थिती होती.
श्री.अनूप कुमार यावेळी म्हणाले, या अभियानामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळेल. गोड्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादनासाठी होणार आहे. तलाव तेथे मासोळी या अभियानामुळे कुटूंबाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या तलावांच जास्तीत जास्त वापर मत्स्योत्पादनासाठी करण्यात यावा. माशांचा आहार केल्यास त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळते. प्रोटिन्समुळे मेंदूचा विकास होतो. संतुलीत आहारासाठी प्रोटीन्स आवश्यक आहे. मागास व आदिवासी भागात तलाव बोड्यामधून मासोळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवून व आहारात त्याचा वापर करुन प्रोटीन्सची कमतरता भरुन काढता येईल. त्यामुळे कुपोषण टाळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
आदिवासी व दुर्गम भागात पोषणाच्या दृष्टीने आहारामध्ये मासोळीच्या वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, अन्नसाखळीत प्रोटीन्सची उपयुक्तता वाढविण्यासाठी माशांचे उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादीत माशांची विक्री व्यवस्था मजबूत करणेही गरजेचे आहे. मत्स्यव्यवसायासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. शीतकरणाच्या माध्यमातून विपणन वाढविणे गरजेचे आहे. विपणन व्यवस्था सुदृढ करणे हा या अभियानाचा एक भाग आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक तलाव मत्स्य बोटूकलीसाठी आणि दहा तलाव मत्स्यसंवर्धनासाठी निवडावे. मास्टर्स टड्ढेनर्सनी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करावे असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, आपला जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. मत्स्यव्यवसायाच्या स्पर्धेत जिल्हा अग्रभागी आहे. मासेमार बांधव तलाव ठेक्याने घेवून मासेमारीवर आपली उपजिविका करतात. हा व्यवसाय पुढे गेला पाहिजे, मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात करुन इतर राज्यात व देशात त्याची निर्यात झाली पाहिजे. मत्स्य सहकारी संस्थांना तलाव हे मत्स्य व्यवसायासाठी मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत २३ ते २४ जून दरम्यान नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे श्री.नितीन गडकरी कृषि व कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक या मास्टर्स टड्ढेनर्सला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मास्टर टड्ढेनर विनोद मेश्राम, रिना रॉय व कल्पना नागपूरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, तालुका कृषि अधिकारी प्रदिप पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.मुंजे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले.