राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान!

0
10

नवी दिल्ली/ मुबंई,दि.17(वृत्तसस्था) : राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी मतदान होत असून, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे.मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून 5,49,442 विजयी उमेदवाराला आवश्यक मते आहेत. रामनाथ कोविंद यांच्या बाजूने भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल.
तर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या उमेदवार असलेल्या मीरा कुमार यांच्या बाजूने काँग्रेस, तृणमूल, माकपा, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ हे पक्ष आहेत.
देशाच्या १४ व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील २८८ आमदारांसाठी विधानभवनात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात लोकसभेचे ४८ तर राज्यसभेचे १९ सदस्य असून हे सर्व जण दिल्ली येथील संसद भवनात मतदान करणार आहेत. विधान परिषद सदस्यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुमारे १४ ते १५ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून भाजपा उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार असल्याचे विधान अपक्ष आमदार रवी राणा यांनी केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने राणा यांचा दावा फेटाळला. मात्र, त्यानंतर तातडीने हालचाल करत विरोधी पक्षातील आमदारांची रविवारी सायंकाळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. या बैठकीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील तसेच जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते. तर दिल्लीहून माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी निरीक्षक म्हणून मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत सर्व आमदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. सोमवारी दहा वाजता सर्व विरोधी आमदार विधानभवनातील काँग्रेस कार्यालयात जमतील. तेथून ते मतदान केंद्रावर जातील. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांनी विचारधारेसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी अंतरात्म्याचा आवाज लक्षात घेऊनच मतदान होणार असल्याचे मनिष तिवारी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक संकुचित, फूटपाडू व सांप्रदायिक विचारसरणीविरुद्धची लढाई आहे. संख्याबळ आमच्याविरुद्ध असले, तरी हा लढा निकराने द्यावाच लागेल. कारण अशा लोकांच्या दावणीला देश बांधू दिला जाऊ शत नाही. – सोनिया गांधी

या वेळची निवडणूक ऐतिहासिक आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या प्रतिष्ठेचे भान राखले. ही आपल्या परिपक्व लोकशाहीची खरी उंची आहे. आता एकही मत वाया जाणार नाही, याची आपल्याला खात्री करायची आहे.- नरेंद्र मोदी