एनडीएकडून व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी : सूत्र

0
7

नवी दिल्ली,दि.१७:राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरु आहे, तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे.एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱ्याला संधी देण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळेच व्यंकय्या नायडूंना उमेदवारी देण्यात आली. उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांचं नाव स्पर्धेत असल्याचे बोलले जात होते. मात्र व्यंकय्या नायडूंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
व्यंकय्या नायडू हे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एक आहेत. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तर तत्कालीन पतंप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिले जाते.

यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी
काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर उपराष्ट्रपतीपदासाठी अद्याप नाव जाहीर करण्यात आलेले नाही.