राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे द्वितीय महाअधिवेशन येत्या ७ ऑगस्टला

0
11

नवीदिल्ली,२०- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.
दिल्लीच्या रफी मार्गावरील रिजर्व बँक परिसरात मंडल आयोग दिनी आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. ईश्वरैया यांचे हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षपदी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अवजड राज्यमंत्री ना.अनंत गीते, केंद्रीय श्रममंत्री ना.बंडारू दत्तायत्र, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.राजेंद्र गेनई, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, मागासवर्गीय संसद समितीचे अध्यक्ष गणेश सिंग, तेलंगाणाचे राज्यसभा सदस्य देवेंद्र गौड, महाराष्ट्राचे खासदार नाना पटोले,तेलंगानाचे खासदार बी.नरसय्या गौड, महाराष्ट्रातील आमदार सुनील केदार, नवीदिल्लीचे माजी कुलपती डॉ. पी.सी. पतंजली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात भारतीय बहुजन आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करणारे सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रणी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद यादव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षपदी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे हे राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. अनुप्रिया पटेल, महाराष्ट्राचे पशू, दुग्ध आणि मत्स्य विकासमंत्री ना.महादेव जानकर, बिहारचे खासदार हुकूमदेव यादव, हरियानाचे खासदार राजकुमार सैनी,तेलंगाणाचे राज्यसभा खासदार रापोलू भास्कर, के. केशवराव, डी. श्रीनिवासन, तेलंगाणाचे माजी खासदार व्ही. हनुमंतराव, महाराष्ट्रातील आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. परिणय फुके, तेलंगाणाच्या बी.सी.सेंटर फार एम्पावरमेंटचे सचिव कस्तुरी जयाप्रसाद हे उपस्थित राहतील
या महाअधिवेशनात देशातील ओबीसींच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीवर चर्चा होणार असून ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढ्याची दिशा आणि दशा यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. ओबीसींवर सतत होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे आयोजन करण्यात आले असून देशातील सर्व ओबीसी बांधवांना या महाअधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे निमंत्रक सचिन राजूरकर, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, मनोज चव्हाण आणि आयोजकांनी केले आहे.