निवृत्तीच्याच दिवशी मिळणार प्रॉव्हिडंट फंड

0
19

नवी दिल्ली,21 सेवानिवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्याच्या खात्यात पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उ्रत्तराप्रसंगी ही माहिती दिली. या संदर्भातील आदेश ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन’तर्फे (ईपीएफओ) प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ आणि कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (ईपीएस) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच, निवृत्तीनंतर कोणत्याही सरकारी कार्यालयाची पायरी चढावी लागणार नाही. या शिवाय निवृत्तीच्या दिनीच सर्व प्रकारचे पेन्शनविषयक लाभही मिळतील. केंद्र सरकारने भविष्यनिर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम निवृत्तीदिनी देण्याचा निर्णय घेतला आहे, का या प्रश्नाच्या उत्तरावर दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. ‘संबंधित सभासदाने नोकरी सोडल्यानंतर अथवा तो निवृत्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत ग्रॅच्युईटीची रक्कम सुपूर्द करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्राने जून २०१४मध्येच घेतला आहे. जेणेकरून ईपीएफओचा सदस्य निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने आणि समाधानाने घालवू शकेल,’ असे बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले.