वाघाशी एकाकी झुंज देऊन त्याने वाचविले स्वत:चे प्राण

0
16

आरमोरी,दि.31: शेतावरुन घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यावर झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून पंजा मारला. पुन्हा त्याने समोरुन हल्ला केला. परंतु जखमी अवस्थेतही त्या शेतकऱ्याने वाघाशी झुंज देऊन त्याला दूर केले. दोघेही पाच मिनिटे एकमेकांसमोर उभे ठाकले. अखेर मित्र धावून आला आणि वाघाला पाठमोरे होऊन पळ काढावा लागला. हा चित्तथरारक प्रसंग अनुभवला आरमोरी तालुक्यातील शिवदास वासुदेव चौके या शेतकऱ्याने.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा व आरमोरी तालुक्यातील रवी, कासवी, उसेगाव, मुल्लूरचक इत्यादी गावानजीकच्या जंगलात गेल्या तीन-चार महिन्यांपासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी कोंढाळा येथील लवाजी मेश्राम व रवी येथील वामन मरापे यांचा वाघाने बळी घेतला आहे. त्यामुळे त्या भागात वाघाची प्रचंड दहशत आहे. शनिवारी(ता.२९) सकाळी रवी येथील शिवदास चौके व रवींद्र कामठे हे रवी-कोंढाळा रस्त्यालगत असलेल्या शेतावर गेले होते. पिकाची पाहणी करुन ते गावाकडे परत येण्यास निघाले. वाटेत ते बकऱ्यांना चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडू लागले. एवढ्यात झुडपात लपून बसलेल्या वाघाने शिवदास चौके यांच्यावर पाठीमागून झडप घातली. वाघाने शिवदासच्या पाठीवर पंजा मारुन समोर उडी घेतली आणि पुन्हा समोरुन हल्ला चढविला. परंतु शिवदास डगमगला नाही. त्याने जखमी अवस्थेत वाघाशी सामना करुन त्यास परतावून लावले. जवळपास पाच मिनिटे दोघेही एकमेकांसमोर उभे होते. लगेच रवींद्र कामठे हा शिवदासच्या मदतीला धावून आला आणि त्याने वाघाला हुसकावून लावले. घाबरलेल्या अवस्थेत दोघेही गावाकडे परत येण्यास निघाले.
याचवेळी जंगलात वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी शिवदासला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. वनपरिक्षेत्राधिकारी पी.आर.तांबटकर यांनी शिवदासला दोन हजार रुपयांची तातडीची मदत केली. आ.कृष्णा गजबे, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी मने, वेणूताई ढवगाये, पंचायत समिती उपसभापती यशवंत सुरपाम, सदस्य वृंदा गजभिये, वडसा वनविभागाचे प्रभारी उपवनसंरक्षक श्री.फुले, विभागीय वनाधिकारी बिलाईकर, सहायक वनसंरक्षक कांबळे आदींनी शिवदास चौकेची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान हल्लेखोर वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे