मुल्ला शाळेतील मुख्याध्यापिकेने केला ‘शालार्थ’ मध्ये घोळ

0
16

शिक्षक कर्मचाऱ्यांची न्यायासाठी वरिष्ठांकडे धावः अद्याप कार्यवाही शून्य

गोंदिया,दि.३१- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेच्या शालार्थ खात्यात गैरव्यवहार केल्याची तक्रार अन्यायग्रस्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, माध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारासह बोगस शाळा सोडल्याचा दाखला दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सदर मुख्याध्यापिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नसला तरी केंद्रप्रमुखाने सदर प्रकरणात शिक्षकांची तक्रार प्राप्त झाल्याचे कबूल केले आहे.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समिती अंतर्गत मुल्ला येथे वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील मुख्याध्यापिकेने शिक्षकांच्या वेतन खाते ‘शालार्थ’ मधून १ लाख ४४ हजार ७६० रुपयांचा गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार संबंधित शिक्षकांनी दि.८ जुलै २०१७ ला देवरीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे याविषयी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली नसल्याने दि.२० जुलै २०१७ ला स्मरणपत्र सुद्धा दिले आहे. संबंधित शाळेच्या शालार्थ खात्यातून मुख्याध्यापिकेने चेक क्र.७२२००६ दि.०९/०९/२०१६ रोजी ११ हजार,चेक क्र.७२२०१४ दि.०१/१२/२०१६ रोजी ३हजार, चेक क्र.७२२०२० दि.०५/०१/२०१७ रोजी १० हजार, चेक क्र.१८१८८३ दि. १६/०१/२०१७ रोजी ५ हजार, चेक क्र.८९५९६२ दि.३०/०३/२०१७ रोजी २६ हजार, चेक क्र. ८९५९७१ दि. १७/०४/२०१७ रोजी २५ हजार, चेक क्र. ८९५९७३ दि. २७/०४/२०१७ रोजी ५४ हजार ५६० आणि चेक क्र.८९५९७६ दि. १२/०५/२०१७ रोजी २० हजार रुपयाचे विड्राल स्वतःच्या नावाने तर चेक क्र.१८१८८१ दि.१०/०१/२०१७ रोजी १० हजार सुशीला भेलावे आणि चेक क्र. ८९५९७५ दि.०९/०५/२०१७ रोजी ५ हजार २०० रुपये सुरेंद्र शिवराम खोटेले यांचे नावे विड्राल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदर शालार्थ खात्यातून शिक्षकांच्या वेतनासंबंधी व्यवहार करण्यात येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. असे असताना सदर मुख्याध्यापिकेने परस्पर रकमेचा गैरव्यवहार केला असून माहे जानेवारी पासून शिक्षकांच्या विमा पॉलिसीचे पैसे वेतनातून कपात करून एलआयसीकडे भरले नसल्याचे आरोप आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांनी वेतनावर शिक्षक सहकारी पतसंस्था आणि ग्राहक संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची वेतनातून कपात करून ती रक्कम अद्यापही संबंधित संस्थांकडे भरणा केली नसल्याचा सांगण्यात येते. यामध्ये सहा शिक्षकांच्या विमा पॉलिसीचे ५७ हजार ८२८ रुपये,ग्राहक संस्थेच्या तीन कर्मचाऱ्यांचे ९४ हजार१४० आणि शिक्षक सहकारी पत संस्थेचे सप्टें.-१६, ऑक्टो.१६, फेब्रु.१७, मार्च१७, एप्रिल १७ या पाच महिन्याचे सुमारे २ लाख ३५ हजार रुपयाचा वेतनातून कपात करून संबंधित संस्थेकडे भरणा केला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
याशिवाय सदर मुख्याध्यापिकेने एका इसमाला बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत दिल्याचे सुद्धा बोलले जात आहे. माध्यान्ह भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना भोजन न देता देयके उचलले असल्याची सुद्धा चर्चा आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी झालेल्या पालकसभेतील कार्यकारिणी निवडीतही घोळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. याविषयी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीत सत्यता आढळून आल्याचे दिसून आले होते. त्यावेळी सुद्धा वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला संबंधित मुख्याध्यापिकेने केराची टोपली दाखविली होती. या गैरव्यवहारांमुळे शालेय वातावरण पूर्णतः गढूळ झाल्याचे नागरिकांसह शिक्षकांचे म्हणणे आहे. याची परिणती विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची सत्यता देवरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी साकुरे यांचेशी जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. मात्र, केंद्र प्रमुख उत्तम टेंभरे यांचेशी संपर्क केला असता संबंधित तक्रारीला त्यांनी दुजोरा दिला असून त्यासंबंधी आपला अहवाल वरिष्ठांना सोपविल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी चौकशी करण्याच्या सूचना शिक्षणविभागाला देत असल्याचे सांगितले.