भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप

0
16

बंगळुरू,दि.31(वृत्तसंस्था)- गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं होतं. या आमदारांची त्या रेसॉर्टमध्ये रविवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपावर करण्यात आला.यावेळी गांधीनगरमधील दाहेगममधील आमदार कामिनीबेन बी राठोड यांनीही भाजपवर आरोप केले आहे. मलाही भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती पण ती ऑफर नाकारल्याचे कामिनीबेन राठोड यांनी सांगितले आहे.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे.
‘भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली. आमचे आमदार इथे मजा-मस्ती करण्यासाठी आलेले नाहीत, तर आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे. गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि गुजरातचे आमदार शक्तीसिंह गोहिल म्हणाले आहेत. आम्ही एकमताने पक्षासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला असून भाजपाला लोकशाहीचा अंत करू देणार नाही, असंही गोहिल म्हणाले आहेत. गुजरात काँग्रेसमधील गळती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 2 आमदार वैयक्तिक आणि राजकीय कारण सांगून गुजरामध्ये परत आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दोन आमदार परत माघारी गेल्यानंतर राहिलेल्या 42 आमदारांना माध्यमांसमोर हजर करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला.
सात आमदारांच्या एका गटाने मात्र त्यांच्यासोबत बंगळुरूला न जाण्याचा निर्णय घेतला. यात वाघेला आणि त्यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना तिथे हलविले आहे.
गुजरात राज्य काँग्रेसचे प्रमुख भरत सोळंकी यांनी सांगितले की, भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवीत आहेत. त्यामुळे आमचे आमदार एकजुटीने बंगळुरूला गेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आमदारांना पैशांच्या जिवावर शिकार करू पाहणाºया भाजपाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी खटला दाखल करावा.