कर्जमाफी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
31

गोंदिया,दि.३१ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्याच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सडक/अर्जुनी, देवरी व सालेकसा येथील आपले सरकार सेवा केद्राला भेट देवून नुकताच घेतला. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, सहायक निबंधक, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, गटसचिव तसेच महाऑनलाईन केंद्राचे जिल्हा समन्वयक राकेश बघेले उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी सादर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सी.एस.सी.केंद्र व ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रावर नि:शुल्क सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा व राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय, सर्व सेवा संस्था, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत येथील विहीत नमुन्यातील कर्जमाफीसाठीचे अर्ज प्राप्त करुन घेता येईल. अर्जासोबत आधारकार्ड झेरॉक्स, कर्जखाते पुस्तिका/उतारा व बचतखाते पुस्तिका इत्यादिसह आपल्या गावाजवळील महाऑनलाईन केंद्र/सी.एस.सी.केंद्र किंवा ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.