४५ हजार घनमीटर गाळ ५२ तलावांतून काढला

0
10

भंडारा,दि.०१: धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आले. या तलावातून काढलेला गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यावर्षी तलावाच्या जलसाठ्यात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे.गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेत जिल्ह्यात झालेले काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी शासनाचा कुठलाही निधी खर्च झालेला नाही. यावर्षी कमी वेळ मिळाला असला तरी चांगले काम झाले आहे. पुढील वर्षाचे नियोजन आतापासून करण्यात येणार असून ज्या तलावांचा लाभ सिंचनासाठी जास्त होणार आहे. अशा तलावांची यादी तयार करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. त्याच तलावातील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सिंचनाला निश्चितच लाभ होईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या ८२ हजार १५६ धरणांपैकी ३१ हजार ४५९ धरणांची साठवणूक क्षमता ४२.५४ लक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातील गाळ काढल्यास ही साठवणूक क्षमता मोठया प्रमाणात वाढणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात या अभियानात ५२ तलावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुक्यात १२, पवनी तालुक्यात ७, तुमसर तालुक्यात ८, मोहाडी तालुक्यात ८, साकोली तालुक्यात ७, लाखनी तालुक्यात ७ आणि लाखांदूर तालुक्यात ८ तलावांचा समावेश करण्यात आला. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे ठरविण्यात आले. यासाठी कुठलाही निधी खर्च न करता संपूर्ण लोकसहभागातून ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ काढण्यात आला. काढलेला गाळ ६७० हेक्टर मध्ये टाकण्यात आला.
भंडारा तालुक्यात १७ हजार ८५५ घनमीटर, पवनी ६ हजार १ घनमीटर, तुमसर ४ हजार १५७ घनमीटर, मोहाडी २ हजार ३४४ घनमीटर, साकोली ७८३, लाखनी ५ हजार १६ घनमीटर व लाखांदूर ८ हजार ८८० घनमीटर गाळ काढला असून हा गाळ भंडारा तालुक्यातील २५० हेक्टर, पवनी ३९ हेक्टर, तुमसर ७९ हेक्टर, मोहाडी ४७ हेक्टर, साकोली २२ हेक्टर, लाखनी १२२ हेक्टर व लाखांदूर १०९ हेक्टर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. या मोहीमेत जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला.