५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे

0
21

गोंदिया,दि.31- देशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्यासह शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार राजकुमार धूत यांचा त्यात समावेश असल्याची माहिती ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात आहे.

७७४ खासदार आणि देशभरातील ४०७८ आमदारांनी निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे ‘एडीआर’ने ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिला अत्याचारांचे गुन्हे दाखल असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी भाजपचे (१४) आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना (७) आणि तृणमूल काँग्रेसचा (६) क्रमांक लागतो. राज्यनिहाय विचार केल्यास देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींवर असल्याचे दिसते. महाराष्ट्र(१२)पाठोपाठ पश्चिम बंगाल (११) आणि ओडिशाचा (६)क्रमांक आहे.

या लोकप्रतिनिधींवर प्रामुख्याने भारतीय दंडविधान संहितेमधील कलम ३५४ नुसार सर्वाधिक गुन्हे नोंदले गेले आहेत. विनयभंगाच्या हेतूने महिलेवर गुन्हेगारी स्वरूपाची बळजबरी केल्यास हा गुन्हा लागू होतो. त्यापाठोपाठ कलम ५०९चा वापर आहे. शाब्दिक आणि हावभावांद्वारे महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्यास हे कलम लावले जाते.५१जणांपैकी चौघे बलात्काराच्या गंभीर आरोपाला तोंड देत आहेत. त्यातील काही जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे, पण एकाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला नाही. राजकीय हेवेदाव्यांतून आपल्याविरुद्ध असले गुन्हे दाखल केल्याचा बहुतेक लोकप्रतिनिधींचा दावा आहे.