आदिवासींकडून लाच घेणारा वनपाल गजाआड

0
26
अमरावती,दि.31- गेल्या काही दिवसांपासून सतत वन कायद्याचा धाक दाखवून विविध सबबीखाली आदिवासींची आर्थिक पिळवणूक करणारा वनविभागाचा वनपाल केवलराम मालवीय याला बुधवारी (दि. ३०) पंधराशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. घरकुलाचा पंचनामा करण्यासाठी ही लाच केवलराम याने स्विकारली. विशेष म्हणजे गावातील २२ गरीब आदिवासींकडूनही केवलराम याने रोख उकळल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत.
राजूसिंग चव्हाण यांनी नियमानुसार इतर काही गावकऱ्यांसह पश्चिम मेळघाट वन खात्याच्या धारणी वनपरीक्षेत्र कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. काटकुंभ हे गाव धारणी पंचायत समितीच्या भोंडीलावा ग्राम पंचायतींमध्ये येत असून वन खात्याच्या पश्चिम मेळघाटातील पाटीया वर्तुळात वसलेले असल्याने पाटियाचे वनपाल केवलराम मालविय यांनी फिर्यादी राजूसिंग मंगलसिंग चव्हाण यांना पंचनामा उरकून तसा अभिप्राय अहवाल मिळवून देण्याच्या सबबीखाली पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर रक्कम चव्हाण यांच्यासाठी प्रचंड मोठी असल्याने अखेर पंधराशे रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी पाटिया  वनपाल केवलराम मालविय याने चव्हाण यांना बंगल्यावर बोलावले होते. चव्हाण यांनी केवलराम याला रोख पंधराशे रुपये देताच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई अमरावती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत राऊत , सहाय्यक पोलिस अधीक्षिका नाशिककर, यवतमाळचे पोलिस निरीक्षक नितीन लेवरकर, अकोल्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर चौहान यांनी ही कारवाई केली.