प्रधानमंत्र्याना एैकण्याची सवय नाही तर मुख्यमंत्री मुंबईत गेल्यावर बदलतात-खा.पटोले

0
11
नागपूर,दि.02- मुख्यमंत्री मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी कोणत्याही भागातील असो, मुंबईत गेले की त्यांची मानसिकता बदलते.”प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ऐकण्याची सवय नाही. इतरांनी सांगितलेले त्यांना पटतसुद्धा नाही. ते लवकर चिडतात,” असा आरोप भंडारा-गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी केला. अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनिअर मित्र परिवारातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘विदर्भातील सिंचन व शेतकऱ्यांचे अश्रू’ हा चर्चासत्राचा विषय होता.यावेळी भाजपचे आमदार डाॅ.परिणय फुके सुध्दा तिथे उपस्थित होते.
महाराष्ट्र हे केंद्राकडून सर्वात कमी पैसे आणणारे राज्य आहे. इतर राज्ये खासदारांमार्फत भरपूर पैसे आणतात. महाराष्ट्र वगळता इतर खासदारांना खूप महत्त्व आहे. त्यांच्यासाठी राज्याच्या राजधानीत निवास व्यवस्था असते. एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी त्यांचा स्वीय सहायक असतो. महाराष्ट्रात मात्र खासदाराकडे दुर्लक्ष केले जाते. कदाचित राज्यातील आमदार व मंत्र्यांना खासदाराचे महत्त्व वाटण्याची भीती वाटत असावी. या संकुचित वृत्तीमुळेच महाराष्ट्र मागे राहिला, असे पटोले म्हणाले. मी शेतकरी आहे. शेतकरी हीच माझी जात व धर्म आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदी यांच्याशीही वाद ओढवून घेतला अाहे. शेतीत सरकारची भागीदारी हवी, ग्रीन टॅक्स लावण्यात यावा आदी मागण्या आपण मांडल्या. शेतीत सरकारी भागीदारी असली तर शेतकरी कदापि आत्महत्या करणार नाही, असे पटोले म्हणाले.
“गोसेखुर्द प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार करणारे ठेकेदारच आता आमदार, खासदार झाले आहेत. भ्रष्टाचारामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे,” असा सल्लाही पटोलेंनी दिला. “खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी राज्याला मिळतो. अनेक राज्ये यात अग्रसेर आहेत. महाराष्ट्र मात्र मागे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदरांची बैठक बोलाविण्यात येते. एका बैठकीत मी महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेणेच बंद केले,” असे सांगून खासदार पटोले फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे तोफ डागली.
मात्र सायकांळी या सर्व प्रकरणानंतर खासदार नाना पटोले यांनी आपण असे बोललो नाही,उलट प्रधानमंत्री शेतकर्यांबाबत गंभीर असल्याचे बोललो तर केंद्राकडून येणारा निधी अपुरा असल्याचे बोलल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.