महिला पत्रकार गौरी लंकेशची गोळ्या झाडून हत्या

0
27

बंगळुरू(वृत्तसंस्था),दि.06 – निर्भिड महिला पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या परखड टीकाकार गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश ह्यांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून तीन गोळ्या घालून हत्या केली. त्या मागील काही दिवसांपासून वैचारिक भूमिकेमुळे उजव्या विचारधारेच्या लोकांच्या निशाण्यावर होत्या. त्या प्रसिध्द कन्नड कवी पी. लंकेश यांच्या कन्या होत्या व लंकेश पत्रिके नावानी एका पत्रिकेचे संपादन करीत होत्या.गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा.लंकेश या उदारमतवादी दृष्टीकोनाच्या होत्या. त्यांनी विशेषतः कट्टर हिंदुत्ववादी प्रवृत्तींविरोधात सातत्याने आवाज उठविला होता.

लंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे. बंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली आहे.

लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे सर्व खटले सीबीआयकडे चालविण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. लंकेश यांच्यावर बदनामीचे अनेक खटले दाखल केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.गौरी लंकेश ट्वीटरसह अन्य सोशल मीडियामध्येही लिखाण करीत असत. त्यांच्या हत्येने धक्का बसल्याचे अनेकांनी ट्विटरवर म्हटले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या कविता कृष्णन यांनी लंकेश यांची हत्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी मालिकेतील हत्या असल्याचे म्हटले आहे.