सातबारावर महिलांची सहखातेदार म्हणून नोंद करा- संजय रामटेके

0
37

चिरेखनीत संवाद पर्व
तिरोडा ,दि.९ : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबतांना दुर्घटना होवून एखादया शेतकरी महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. शेतीची सहमालक म्हणून आणि विविध योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबातील मुलीचे, सुनेचे आणि पत्नीचे नाव सातबारावर सहखातेदार म्हणून नोंद करावी, असे आवाहन तिरोडा तहसिलदार संजय रामटेके यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे नुकतेच गणेशोत्सवानिमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळ चिरेखनी समाज ग्रामसंस्था व कल्याण ग्रामसंस्था आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमाच्या अध्यस्थस्थानावरुन श्री.रामटेके बोलत होते. गटविकास अधिकारी श्री.इनामदार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सरपंच जगन्नाथ पारधी, उपसरपंच सोनू पारधी, विस्तार अधिकारी श्री.उके, श्री.बन्सोड, कृषिमित्र नंदराम पारधी, पाणलोट समितीचे सचिव लेखराम राणे, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येडे, ग्रामसेवक श्री.तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
एक गाव एक गणपती ही संकल्पना चिरेखनी या गावात प्रत्यक्ष साकारल्याचे सांगून श्री.रामटेके म्हणाले, संवाद पर्व हा कार्यक्रम शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी यानिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेती करुन पिकाचे उत्पादन घ्यावे. सेंद्रीय मालाला चांगला भाव मिळतो. सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ योजना यासह विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री.इनामदार म्हणाले, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जे उघड्यावर शौचास जातील त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वाच्या आयोजनातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. सोबतच त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
संवाद पर्व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला बिसेन, उपाध्यक्ष रेघन पारधी, सचिव चंद्रकला कुर्वे, सहसचिव जीवनकला पारधी, कोषाध्यक्ष कल्पना रिनाईत, कल्याण ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे, उपाध्यक्ष स्वानंदा कोटांगले, सचिव निला पारधी, सहसचिव अलका कुर्वे, कोषाध्यक्ष मुनेश्वरी भगत, जोती पटले, वैशाली पारधी, प्रणिता राणे, गीता मडावी यांनी परिश्रम घेतले. संचालन व उपस्थितांचे आभार रेखा रामटेके यांनी मानले.