छोट्या महापालिकेत थेट जनतेतून महापौर-मुख्यमंत्री

0
11

औरंगाबाद दि. 9 :  राज्यातील ‘क’ व ‘ड’ दर्जाच्या महानगरपालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी राज्य सरकार लवकरच अभ्यासपूर्ण निर्णय घेईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 9) दिले. औरंगाबाद शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, ”राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. मात्र आगामी काळात छोट्या म्हणजेच ‘क’ व ‘ड’ दर्जाच्या महापालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी शासन अभ्यासपूर्ण निर्णय घेईल.

औरंगाबाद महापालिकेतर्फे दोन दिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, मध्यप्रदेशचे मंत्री उमाशंकर गुप्ता, महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक शेजवलकर, आमदार अनिल सोले, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे,विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर  यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महापौरांना प्रशासकीय, आर्थिक अधिकार हवेत, हे खरे आहे. मात्र, त्यासोबत महापौरांनी जबाबदारीचेही भान ठेवावे. राज्यातील सर्वच महापालिका विकास आराखडे तयार करतात. हे आराखडे शोभेचे बाहुले बनत आहेत. विकास आराखड्यांची शंभर टक्के अंमलबजावणी झाली तर शहरांचे चित्र पुर्णपणे बदलून जाईल. अर्बन इन्फ्रास्ट्रक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागलेली आहे. त्यासाठी प्रशासनालाही पारदर्शक होणे गरजेचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांना कानपिचक्या दिल्या.प्रारंभी प्रास्ताविक महापौर तथा संयोजक बापु घडामोडे यांनी केले.