आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या संतप्त विद्यार्थ्यांचा विद्यापीठासमोर ठिय्या

0
9

नागपूर,दि.14- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी  विविध मागण्यांसाठी अडीच तास कॅम्पसच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून प्रचंड घोषणाबाजीने विद्यापीठ दणाणून सोडले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन खळबडून जागे झाले. आंदोलनाची दखल घेऊन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याच वेळी अनेक मागण्या तात्काळ मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी निवेदने दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील विविध विभागांमध्ये पाण्याची सुविधा नाही, योग्य स्वच्छता नाही, मुलींच्या ‘कॉमन रुम्स’ची दुरावस्था, मुलींच्या वसतीगृहाची समस्या, वसतीगृह ते कॅम्पस बस सुविधा आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे बुधवारी संतप्त झालेल्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
विशेष म्हणजे, दोन वर्षापूर्वी संघटनेतर्फे शिक्षक दिनी याच प्रकारचे आंदोलन करून कॅम्पसचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा विद्यार्थ्यांच्या बहुतांशी याच मागण्या होत्या. दोन वर्षानंतरही विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विद्यापीठ परिसरात जवळपास ३२ विभाग असून प्रत्येक विभागात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. यासोबतच विभागातील प्रसाधन गृहांमध्येही स्वच्छता नसते. ‘वॉटर कुलर’ची सफाई होत नसल्यामुळे तिथेही घाण आहे. याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना तक्रार केली असता त्यांनी समस्या सोडविण्यास ते असर्मथ असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय मुलींचे वसतीगृह परिसरापासून खूप लांब असल्याने व या मार्गावर बस सुविधा नसल्याने मार्गावरून बस सुविधा सुरू करण्यात यावी. प्री-पीएचडी कोर्स वर्कचे शुल्क कमी करणे, प्री-पीएचडी कोर्स वर्कची परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये घेणे, आंतरराष्ट्रीय सेमिनारसाठी संशोधक विद्यार्थ्यांना प्रवास खर्च देणे, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे, ह्युमॅनिटीच्या विभागांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये अध्यापन करणे आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांंनी कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर जवळपास अडीच तास ठाण मांडून प्रशासनाला हादरवून सोडले. विद्यार्थ्यांच्या आक्रमक नारेबाजीने कॅम्पसमध्ये पोलिस प्रशासनाला बोलविण्यात आले. सुरुवातीला पोलिस निरीक्षक खंडाळे यांनी विद्यार्थ्यांंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांंचा रोष लक्षात घेता अखेर कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिवांना स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांंच्या समस्या जाणून घ्याव्या लागल्या. या आंदोलनात विद्यापीठाच्या विविध विभागाच्या शेकडो विद्यार्थ्यांंचा सहभाग होता. या शिष्टमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समीर महाजन, महेश बन्सोड, प्रतीक बनकर, भूषण वाघवारे, मंगेश भेसारे, स्नेहल वाघमारे, महेश लाडे, शबीना शेख, विकेश तिमांडे, प्रिया कोंबे आदी उपस्थित होते.