जलशिवार योजनेतून दतोरा झाले जलसमृद्ध,राज्यातील फिडर चॅनलचा पहिला प्रयोग यशस्वी

0
10

जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे यश

      अभियंता दिन विशेष

खेमेंद्र कटरे/ सुरेश भदाडे
गोंदिया,दि.१५- पाण्याचे आटत जाणारे स्त्रोत आणि भूजल पाण्याचा होणारा अनियंत्रित उपसा या बाबी नजीकच्या काळात मोठ्या भयावह स्थिती निर्माण करणाऱ्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य भविष्यात आणखी गंभीर होऊ नये,यासाठी महाराष्ट्रात जलयुक्तशिवार संकल्पनेचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून पुढे आला.त्या संकल्पनेला गेल्या दोन तीन वर्षात प्रतिसादही उत्स्फुर्त मिळाला. त्यातच पूर्व विदर्भ म्हटला की मामा तलावांचा भाग. त्यातही गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून सर्वदूर ख्यातनाम असला तरी जिल्ह्यातील जवळपास सर्वच मालगुजारी तलावांतील जलसाठ्याची स्थिती पाहिजे तशी समाधानकारक सध्याच्या स्थितीत नाही. अशा परिस्थितीत गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने गोंदिया तालुक्यातील सुमारे १० तलावांचा जलशिवार योजनेतून कायापालट करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. या निर्णयाला स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलेले पाठबळ सुद्धा महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने राबविलेल्या संकल्पनेतून गोंदिया तालुक्यातील दतोरा येथील मालगुजारी तलावाचे कायापालट करण्यात आले. परिणामी, जलशिवार योजनेतून दतोरा हे गाव जलसमृद्ध झालेच नव्हे तर जलयुक्त शिवारमध्ये फिडर चॅनलच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन देणारा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे.
गोंदिया जिल्ह्यात फारपूर्वी पासून मालगुजारी तलाव आहेत, हे जरी खरे असले तरी त्या तलावांची आजची सिंचनक्षमता वा साठवणुकीची क्षमता यावर मर्यादा आल्या आहेत. वाढत जाणारी लोकसंख्या, विकासाच्या नावावर होणारे सीमेंटीकरण अशा आदी कारणाने या तलावात पाण्याची होणारी आवक प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत गोंदिया जिह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केलेले कार्य नक्कीच अभिनंदनीय ठरले आहे. सन २०१६-१७ या वर्षात जलशिवार अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली. यासाठी आमदार गोपाल अग्रवाल यांनीसुद्धा पुढाकार घेतला. यामध्ये ३ हजार लोकवस्तीच्या दतोरा गावाची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश चौधरी व शाखा अभियंता वासुदेव रामटेककर यांनी उत्तम जबाबदारी पार पाडत गावाच्या सभोवतालच्या नैसर्गिक प्रवाहाचे सूक्ष्म निरीक्षण केले. इतर तलावांच्या ओवरफ्लोचा शास्त्रोक्त अभ्यास केला. यासाठी त्यांना तत्कालीन कार्यकारी अभियंता पथाडे आणि विद्यमान कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांचे महत्त्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तेवढेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार व विद्यमान मुकाअ आर.एच.ठाकरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या अभियंत्यांच्या जिद्दीतून दतोरा येथील सुमारे सातशे मीटर लांबीचा फिडर चॅनल तयार करण्यात आला. यावर १९ लाख ५७ हजार रुपयांचा अंदाजपत्रक तयार करून  ५३५ मीटर लांबीचे खुले नहर आणि १६५ मीटर लांबीची भूमिगत पाइपलाइन टाकण्यात आली. तलावाचे ओवरफ्लो वळविण्यासाठी काँक्रिटची भिंत तयार करण्यात आली. या संपूर्ण कामावर १७ लाख ४१ हजार रुपये खर्च करण्यात आले. राज्यातील जलयुक्त शिवारमध्ये तयार झालेला फिडर चॅनलचा प्रयोग हा पहिला प्रयोग ठरला आहे.
दतोरा मालगुजारी तलावाला आता रोलमॉडेल म्हणून डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील सर्वच मालगुजारी तलावांसंबंधी धोरण आखण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करणे, आज अभियंता दिनाच्या निमित्ताने अपेक्षित आहे.
या योजनेतून साकारलेल्या या फीडर चॅनेलचा चमत्कार पहिल्याच वर्षी दिसला. यावर्षी अत्यंत कमी पर्जन्यमान झाले असताना सुद्धा गेल्या २८ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने नवीन तलाव फुल्ल भरून गावातील इतरही तलाव त्याच्या ओवरफ्लोचे नियोजन केल्यामुळे भरू लागले आहेत. गेल्या पंधरा वर्षात गावातील तहानलेले तलाव या योजनेच्या माध्यमातून तुडुंब भरताना दिसत आहे. गावातील पाण्याची समस्या सुटल्याने गावचे सरपंच रोशन पाथोडे आणि माजी सरपंच धनलाल कावळे,सुरजलाल महारवाडे, सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके यांचेसह नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. अभियंता दिनी या कार्यास हातभार लावणाऱ्या सर्व अभियंता बांधवाच्या कार्याला सलाम.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.  या जिल्ह्यात जवळपास १ हजार ७८६च्या आसपास तलाव आहेत. यापैकी सद्यःस्थितीत सुमारे १ हजार ४५९ तलाव हे सिंचनाच्या दृष्टीने अस्तित्ताव आहेत. या तलावांच्या माध्यमातून केवळ सिंचन नाही तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. मत्स्य व्यवसाय, शिंगाडे व्यवसाय सारख्या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक क्रांतीसुद्धा होत आली आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि सुपीक मातीचे होणारे वहन हे या तलावाच्या माध्यमातून थांबून भूजल साठ्यात होणारी वाढ ही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होत असते. त्यामुळे जीवसृष्टीच्या संबंधाने पाण्याचे साठे विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, हे येथे अधोरेखित होते.