नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजवंदन समारंभ उत्साहात संपन्न

0
94

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.18-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.  
ध्वजवंदनापूर्वी पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, आमदार सर्वश्री अमर राजुरकर, हेमंत पाटील, डी. पी. सावंत, आमदार सौ. अमिता चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, आदींनी पुष्पअर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सहदेव पोकळे यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले. व्यंकटेश चौधरी, स्नेहलता स्वामी, मुगाजी काकडे यांनी समारंभाचे सुत्रसंचालन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.