श्रमिक टिळक पत्रकार भवनाच्या सुसज्ज वास्तुसाठी सहकार्य – देवेंद्र फडणवीस

0
5
  • पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे उद्घाटन
  • प्रेस क्लब नागपूरचे वैभव ठरेल
  • पत्रकारांच्या गृहनिर्माणासाठी पुढाकार

नागपूर दि.१९:: 
पत्रकार हे लोकशाहीचे संरक्षण करणारे शिपाई असून समाजानेही त्यांच्या मागे उभे रहावे याच हेतुने. पत्रकारांसाठी असलेले श्रमिक टिळक पत्रकार भवनाच्या वास्तुची पुनर्बांधणी करून त्या जागेवर सुसज्ज आणि स्मार्ट पत्रकार भवन बांधकामासाठी संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
सिव्हील लाईन परिसरातील स्वाती बंगला येथे सुरु करण्यात आलेल्या सुसज्ज अशा पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास खासदार अजय संचेती, डॉ.विकास महात्मे, कृपाल तुमाने, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुंबई प्रेस क्लबचे सचिव धर्मेंद्र जोरे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी आदी उपस्थित होते.
मुंबई प्रेस क्लबच्या धर्तीवर नागपूर येथेही सुसज्ज असा प्रेस क्लब असावा अशी अपेक्षा होती. ती आज पूर्ण होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्रीफडणवीस म्हणाले की, प्रेस क्लबची वास्तू नागपूरचे वैभव ठरावे. तसेच पत्रकारांसाठी अत्याधुनिक ग्रंथालयासह सर्वच सुविधा उपलब्ध करुन दिल्यास दैनंदिन कामानंतर काही काळ चांगल्या वातावरणात घालवता येईल. श्रमिक टिळक पत्रकार भवनाचे वास्तुचा पुनर्विकास करुन नागपूर ज्याप्रमाणे स्मार्ट बनत आहे त्याच पद्धतीने पत्रकार भवनाची सुद्धा स्मार्ट वास्तु उभी रहावी अशी अपेक्षासुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार कॉलनीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प तसेच ज्यांना घरे मिळाली नाही अशा पत्रकारांसाठी जागा अथवा घरे देण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस क्लबसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे पत्रकारांचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रेस कल्बच्या माध्यमातून पत्रकारांना डिजिटल लायब्ररीसह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देताना पत्रकारांसाठी सदस्यता शुल्क कमी ठेवावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.प्रारंभी पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिले पालक सदस्य, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पालक सदस्य करण्यात आले. मुंबई प्रेस क्लबचे सचिव धर्मेंद्र जोरे यांनी नागपूर प्रेस कल्बच्या सर्व सदस्यांना मुंबई प्रेस क्लब येथे सदस्य म्हणून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी केली. प्रदीप मैत्र यांना प्रेस क्लबचे पहिले सदस्य करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. खासदार अजय संचेती यांनी यावेळी मार्गदर्शन केले.प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी स्वागत केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रेस क्लबचे उद्घाटन झाले.  तसेच उपलब्ध सुविधांची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौसिक यांनी सुत्रसंचालन केले.सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी आभार मानले.