निमगाव लघु प्रकल्पासाठी सव्वा चौदा कोटीं मंजूर

0
9

गोंदिया,दि.२०– जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येत असलेल्या निमगाव लघु प्रकल्पाच्या वनजमिनीसाठी होणारा खर्च हा प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्केपेक्षा अधिक असल्याने बाधित होणाèया वनक्षेत्रापोटी उर्वरित १४ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांचे मालमत्ता मूल्य वन विभागास देण्यास मंगळवारला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.यासाठी विद्यमान आमदार विजय रहागंडाले यांच्यासह माजी आमदार दिलीप बनसोड यांनीही हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न चालविले होते.
प्रकल्पाच्या प्रस्तावित लाभक्षेत्रातील गावे ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भूमीहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा समावेश आहे. सर्व गावे नक्षलग्रस्त भागातील असून या भागाचा विकास होण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे.या प्रकल्पामुळे तिरोडा तालुक्यातील १५ गावांतील ८१८ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.जुलै १९७३ मध्ये मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पाची घळभरणी वगळता दोन्ही तिरावरील ८० टक्के मातीकाम रोहयोअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पूरक कालवा आणि आगमन-निर्गमन नालीचे काम ४० टक्के झाले असून सांडव्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वनजमिनीच्या अडचणीमुळे प्रकल्पाचे उर्वरित काम सुरू झाले नसल्यामुळे सिंचन क्षमता निर्माण होऊ शकले नाही. प्रकल्पासाठी एकूण १४१.६२ हेक्टर वनजमीन घेण्यात येत असून या वनक्षेत्राचे नक्त मालमत्ता मूल्य व पर्यायी वनीकरणासाठी एकूण २४ कोटी ८८ लाख ९४ हजार रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी १० कोटी ६२ लाख ८ हजार रुपयांस यापूर्वी मान्यता देण्यात आली असून उर्वरित १४ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांस मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकित मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार विजय रहागंडाले यांनी दिली आहे.