सालेकसा येथे सहारा साधन केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट

0
9

गोंदिया,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सालेकसा तालुक्यात बचतगटाचे काम मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे सुरु आहे. याच बचतगटांची सालेकसा येथे असलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्राला नुकतीच झारखंड राज्याचे समाजकल्याण विभागाचे विशेष सचिव ब्रजेश कुमार दास आणि झारखंड आदिवासी विकास समितीचे संचालक भुजेंद्र बस्की यांनी भेट दिली व गावपातळीवर काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यवसाय, उद्योग व कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्तंड, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, साधन केंद्राच्या व्यवस्थापक शालु साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
ग्रामीण भागात महिलांच्या उपजिविका वाढविण्याचे कार्य कशा पध्दतीने केले जात आहे याबाबतची माहिती तालुका कार्यक्रम व्यवस्थापक श्री.गायकवाड यांनी दिली. पशुसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, कृषिसखी, समुदाय कृषि व्यवस्थापक, मत्स्यसखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक यांच्या कार्याची माहिती यावेळी सादरीकरणातून त्यांनी दिली.
या बैठकीत पशुसखी, कृषिसखी, मत्स्यसखी यांच्या स्तरावर ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डसची पाहणी झारखंडच्या अधिकाऱ्यांनी केली. श्री.सोसे यांनी जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या महिला बचत गटांच्या विविध व्यवसायाबाबत व योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. यावेळी तालुक्यातील २५ पशुसखी, १० कृषिसखी, ५ मत्स्यसखी, ७ समुदाय पशुधन व्यवस्थापक, २ समुदाय कृषि व्यवस्थापक, २ समुदाय मत्स्यव्यवस्थापक, माविम जिल्हा कार्यालय व सहारा लोकसंचालीत साधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.