सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट महिलांचे केले कौतुक

0
13

सालेकसा ,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदियाच्या वतीने सालेकसा तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा संचालीत बचतगटांच्या महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या आमगाव/खुर्द येथील सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या समाजकल्याण विभागाचे विशेष सचिव ब्रजेश कुमार दास व झारखंड आदिवासी विकास समितीचे संचालक भुजेंद्र बस्की यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, साधन केंद्राच्या व्यवस्थापक शालु साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कृषि केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता कां भासली. कृषि केंद्र सुरु केल्यानंतर आलेल्या अडचणी, या अडचणींची केलेली सोडवणूक याबाबतची माहिती कृषि केंद्र चालविणाऱ्या महिलांनी यावेळी दिली. या भागात भात हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु शेती करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक क्षमता नसते. यासाठी त्यांना कर्ज काढून पीक घ्यावे लागते. माविमअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या माध्यमातून श्री पध्दतीने भात लागवडीची कार्य सुरु करण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणी बियाणे व खते जास्त किंमतीत खरेदी करावे लागत असायचे व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जायची. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ती जास्त किंमतीत खरेदी करावी लागत असायची. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी बचतगटांचे कृषिकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून कृषि केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके कृषि केंद्रातून विक्रीसाठी कृषि विभागाकडून परवाना मिळविण्यात आला. एप्रिल महिन्यात गाव आणि गट स्तरावर बि-बियाणे व खते यांची मागणी गोळा करण्यात येते. तालुकानिहाय मागणी एकत्र करुन विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि.जिल्हा कार्यालय गोंदिया यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव व माविम जिल्हा कार्यालय यांच्याकडून हमीपत्र सादर करण्यात येते. खते व बि-बियाणे ठेवण्यासाठी गोदाम व कार्यालयाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कृषि केंद्राच्या कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्ष अर्चना चुटे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.
उत्तरोत्तर या केंद्राची सेवा तालुक्यातील जास्तीत जास्त गरीब महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या भेटीदरम्यान सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष अर्चना चुटे, उपाध्यक्ष धनवंता वडगाये, सचिव सुकेश्वरी रहांगडाले, कोषाध्यक्ष सुनीता खेर, सहसचिव प्रिती कटरे, सदस्य दमयंती मौजारे, ममता लिल्हारे, वंदना मेंढे, लता टेंभरे, सुनीता कटरे, वैशाली हरिणखेडे आदी उपस्थित होत्या.