कर्जमाफीचा लाभ दिवाळीपुर्वी अशक्य-खा.प्रफुल पटेल

0
12

गोंदिया,दि.23(खेमेंद्र कटरे)- गोंदिया- भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भासह महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून महाराष्ट्र सरकारची कर्जमाफीची घोषणा म्हणजे फसवी योजना असून या योजनेचा लाभ कुठल्याही परिस्थितीत मार्चपुर्वी शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी असल्याची टिका करीत हे सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल म्हणाले.ते आज गोंदिया-भंडारा येथे पक्षाच्या जिल्हा मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.कर्जमाफीसाठीची आॅनलाईनची प्रकिया ही किचकट प्रक्रिया असून मुदतीत भरलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.जिल्हा उपनिबंधकामार्फत तपासलेले अर्ज हे तालुकानिंबधकाच्यावतीने प्रत्येक गावात चावडी वाचनाच्या माध्यमातून तपासले जाणार आहेत.त्यानंतर त्या अर्जावर विचार केला जाणार आहे.त्यामुळे जेव्हा चावडी वाचनाचा प्रकार होईल तेव्हा गावातील लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता वर्तवित ही योजनाच फसणार असल्याचे पटेल म्हणाले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची वाईट अवस्था झाली असून गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालय असलेल्या केटीएस व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाकडे बघितल्यावर आपणासही वाईट वाटते असे म्हणत प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कामकाजात चुकत असल्याचे म्हणाले.जिल्हा सामान्य रुग्णालय असले तरी त्याची ईमारत व इतर गोष्टीकडे बघितल्यास किती निकृष्ट दर्जाचे बांधकाम व देखरेख होते हे बघावयास मिळते असे म्हणाले.सोबत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी श्रेयाचे राजकारण करणे सोपे असते परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते न झाल्यानेच आज मान्यता न देण्याचा विचार समोर येत आहे.याबाबत आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे पटेल म्हणाले.जे लोकामधून निवडून आले त्यांनी पळून न जाता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास करण्यासाठी धावपळ केली पाहिजे.माझे कुणी एैकत नाही हे सांगून चालणार नाही.आपण काय केलात हे जनतेला आधी दाखवा असेही पटेल म्हणाले.

30 रुपयाच्या पेट्रोलवर 50 रुपयाची कमाई

आज देशात सर्वचस्तरावर पेट्रोलचे दर  हे डाॅलरच्या तुलनेत 30 ते 35 रुपये प्रतिलिटर असायला हवे.परंतु सरकार एका पेट्रोलवर 50 रुपयाची कमाई करीत आजपर्यंत सुमारे 4 ते 5 लाख कोटी रुपयाची कमाई पेट्रोलच्या माध्यमातून सरकारने केल्याचे खा.पटेल म्हणाले.आमचे युपीएचे सरकार असताना डाॅलरचे दर अधिक असतानाही आमच्या काळात पेट्रोल 80 च्या वर पोचले नव्हते परंतु सध्यातर डाॅलरचे दर कधीपासूनचे कमी असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.सोबतच गॅसवरील सबसिडी सुध्दा बंद केली असून कुठल्याच खात्यावर सबसिडी जमा होत नसल्याचेही सांगत सरकार सबसिडीच बंद करायला निघाल्याचे म्हणाले.देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईस आली असून मोदी सरकारच्या काळात निर्यातमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.निर्यातमध्ये झालेली घट भरुन काढण्यासाठी सबसिडी बंद करणे ,पेट्रोलच्या दरात वाढ करुन तो पैसा सरकार वसूल करीत असल्याचा आरोप खा.पटेल यांनी केला.मेक इन इंडियाच्या नावावर गाजर दाखविण्याचे काम केले असले तरी डोकलाम मध्ये झालेली चिनची माघार ही आर्थिक व्यवस्थेचा परिणाम बघून झाल्याचे म्हणाले.भारतासोबत संबध ताणल्यास 3 लाख कोटीच्या व्यापारावर चिनला फटका बसू शकला असता तो टाळण्यासाठी चिनने डोकलाम मध्ये ताळमेळ बसवत माघार घेतल्याचे ही पटेल म्हणाले.देशात भाजपचे सरकार आल्यानंतर कुठलेच बदल झाले नसून विकासही झालेला नाही.ज्या गुजरात मधून मोदी आलेत त्या गुजरातमधील शेतकरी सुध्दा अडचणीत असून अस्वच्छतेचा कहर गुजरातमधल्या विविध शहरात बघावयास मिळतो.