गडचिरोली,दि.25 – जिल्ह्यातील जांभियागट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस आज सकाळच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गट्टा-कोठी मार्गावर क्लेमोर माईन्सचा स्फोट करुन नक्षलविरोधी अभियान राबविणार्या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल्यांचा डाव फसला. त्यामुळे पोलिस थोडक्यात बचावले.त्यानंतर नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.पोलिसांनी वेळीच सतर्क होऊन नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यामुळे पोलीस थोडक्यात बचावले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन क्लेमोर पाईप, बॅटरी, स्प्रींटर्स, वायर बंडल ताब्यात घेतले. घटनास्थळ हे गट्टा पोलिस मदत केंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे.गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत रस्त्यावर नक्षल्यांनी भू-सुरुंग स्फोट करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १८ सप्टेंबरला नक्षल्यांनी जांभिया नाल्याजवळ भू-सुरुंग स्फोट घडविला होता.